घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! (photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी २०२६ मध्ये या नवीन घरांच्या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडेल. मुंबई मंडळाची ऑक्टोबरमधील लॉटरी पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोकण मंडळाच्या या लॉटरीकडे लागले आहे.
कोकण मंडळाची ही घरे प्रामुख्याने खालील विकसित आणि मागणी असलेल्या भागांमध्ये असतील:
ठाणे
कल्याण
डोंबिवली
घोटकोपर
या लॉटरीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे घरांचे साठे असतील. पहिले म्हणजे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणारी १५ आणि २० टक्के आरक्षित घरे, आणि दुसरे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) उपलब्ध होणारी घरे. यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मिळणार आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील म्हाडाच्या घरांना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. २०२५ मध्ये ५ हजार घरांसाठी तब्बल १.५० लाखांहून अधिक अर्ज आले होते. मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने, सर्वसामान्यांसाठी म्हाडा हा एकमेव भरवशाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे यंदाच्या २ हजार घरांच्या लॉटरीसाठीही मोठी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इच्छुक नागरिकांनी आपले ‘म्हाडा प्रोफाईल’ अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि Domicile Certificate तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी कोकण मंडळाची ही घोषणा ‘नव्या वर्षाची मोठी भेट’ ठरणार आहे.






