मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद
Mumbai Coastal Road Tunnel News Marathi : मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने बुधवारी मोठी दुर्घटना टळली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेनंतर बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली.
हा बोगदा कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हाजी अली आणि वरळी दरम्यान आहे. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाची वाहने तात्काळ बोगद्यात पोहोचली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. बोगद्यातील आगीच्या ज्वाला पाहून ये-जा करणारे लोक घाबरले. अडकणे टाळण्यासाठी अनेक वाहनांनी अचानक यू-टर्न घेतल्याने काही काळ घबराट पसरली. घटनास्थळी असलेल्या पथकांनी बचावकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील दोन्ही दिशेची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. धूर बाहेर काढण्यासाठी बोगद्यातील व्हेंटिलेशन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या घटनेमुळे कोस्टल रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र कार पूर्णपणे जळून नष्ट झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून बोगद्यातील सुरक्षितता व्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे..






