मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
उद्घाटन समारंभाला मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री, महाराष्ट्र सरकार, तसेच विजय चौथईवाले, प्रभारी – परराष्ट्र विभाग, भाजप, यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे या आठवडाभर चालणाऱ्या संविधान, कायदा आणि प्रशासन विषयक चर्चांना एक सशक्त दिशा मिळाली.
या कॉन्क्लेव्हचे मुख्य सूत्र आहे ‘संक्रमण काळ’ जागतिक पातळीवरील अस्थिरता, संस्थांवरील कमी होत चाललेला विश्वास आणि बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर न्याय्य आणि मानवी व्यवस्थेचा शोध. यानिमित्ताने भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा गौरव करण्यात येत असून, आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संविधानिक मूल्यांची पुनर्स्थापना कशी करता येईल, यावर सखोल चर्चा होत आहे.
पहिल्या दिवशी झालेल्या “A Just Legal Order @75” या विशेष सत्रात देशातील नामवंत न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी सहभाग घेतला. या चर्चेत न्यायप्रणाली अधिक जलद, पारदर्शक आणि जनतेकेंद्रित कशी करता येईल, यावर भर देण्यात आला. न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करणे हे सामाजिक स्थैर्य आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
EPFO: आता डोक्याला ताप नाही! PF मधून पैसे काढणं झालं सोपं, काय आहे सरकारची नवीन तरतूद?
पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये
न्या. भूषण आर. गवई, माजी सरन्यायाधीश, भारत
न्या. बी. एन. श्रीकृष्ण, माजी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय
न्या. चंद्रशेखरजी, मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय
नितीन ठक्कर, ज्येष्ठ वकील व अध्यक्ष, बॉम्बे बार असोसिएशन
यांचा समावेश होता.
या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे 25,000 चौ. फूट क्षेत्रफळाचे संशोधनाधारित भव्य प्रदर्शन, ज्यामध्ये वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेतील 12 परिवर्तनशील तत्त्वे सादर करण्यात आली आहेत. तसेच भारतीय संविधानाच्या 75 वर्षांचा प्रवास प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या दृष्टिकोनातून मांडणारे स्वतंत्र कायदेविषयक प्रदर्शनही यामध्ये समाविष्ट आहे. हे प्रदर्शन तज्ज्ञांबरोबरच सामान्य नागरिकांसाठीही माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
आयोजकांच्या मते, पहिल्या दिवशी झालेल्या चर्चांमधून मिळालेले निष्कर्ष धोरणात्मक शिफारशींच्या स्वरूपात संकलित करण्यात येतील आणि शेवटच्या दिवशी सादर होणाऱ्या कॉन्क्लेव्ह कम्युनिके मध्ये त्यांचा समावेश असेल. उद्याच्या सत्रांमध्ये प्रशासन, समाज आणि जागतिक सहकार्याशी निगडित विषयांवर चर्चा होणार असून, भारतीय विचारधारेला व्यवहार्य आणि धोरणात्मक उपायांमध्ये रूपांतरित करण्याचा हा प्रयत्न पुढे नेण्यात येणार आहे.






