सभागृहात इंग्रजीत विचारला प्रश्न, नारायण राणेंनी दिलं भलतंच उत्तर! दमानियांचे टीकास्त्र

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भाजप खासदार कार्तिकेय शर्मा (Karthikeya Sharma) यांनी इंग्रजीत त्यांच्या खात्यासंबंधीचा एक प्रश्न विचारला. पण राणेंना प्रश्नाचा अर्थबोध झाला नाही आणि त्यांनी प्रश्नाचे भलतेच उत्तर दिले.

  दिल्ली : सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, राज्यसभेमध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजप (BJP) खासदार कार्तिकेय शर्मा (Karthikeya Sharma) यांनी इंग्रजीत त्यांच्या खात्यासंबंधीचा एक प्रश्न विचारला. पण राणेंना प्रश्नाचा अर्थबोध झाला नाही आणि त्यांनी प्रश्नाचे भलतेच उत्तर दिले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील तो शेअर करत नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.

  नेमकं झालं काय ? 

  खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला की ’MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावले उचलणार?’ पण राणेंना नेमका प्रश्न काय हेच कळाले नाही. त्यामुळे ते काहीसे गडबडले. आणि त्यांनी उत्तर देताना म्हटले की, “MSME क्षेत्राला चालणा देण्यासाठी आपण काय काय केलं याची यादी त्यांनी सभापतींच्या परवानगीनं वाचून दाखवू इच्छितो.”

  पुढे नारायण राणे यांनी प्रश्नाचं नेमके उत्तर सोडून आपल्या खात्याची माहिती द्यायला सुरुवात केल्यानं विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. यानंतर सभापतींनी त्यांना पुन्हा एकदा प्रश्न हिंदीमध्ये समाजावून सांगितला. त्यावर राणे म्हणाले की, “मी वाचून दाखवतो आहे ते उद्योग सुरु झाल्यानंतर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. फॅक्टरीज जर बंद राहिल्या तर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत का? असे उत्तर नारायण राणे यांनी दिले.

  अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील नारायण राणे यांच्या संसदेतील या प्रसंगावरुन टीकास्त्र डागलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दमानिया म्हणाल्या, “नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला ….’MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार’ हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार ?  नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात …..आणि बॉस चा वर्धास्त फार काळ चालत नाही.” अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी नारायण राणे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.