सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर
नगराध्यक्षपदाची सूत्रे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे देत सिन्नरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे १३ नगरसेवक निवडून दिले. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग करत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटाचे १४ नगरसेवक विजयी केले. त्यामुळे नगरपालिकेतील कामकाजासाठी कोकाटे आणि वाजे या दोन्ही नेत्यांना समसमान संधी मिळाली आहे. मात्र अध्यक्षपदी आमदार कोकाटे समर्थक विठ्ठल उगले यांची वर्णी लागल्याने सत्ता परिवर्तन करत कोकाटेच बाजीगर ठरले आहेत.
कोकाटे वाजे यांच्यासह भाजपाचे २ आणि शिंदेसेनेचा १ नगरसेवक निवडून आल्याने दोन्ही पक्षांनी नगरपरिषदेत मर्यादित स्वरूपात प्रवेश मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभांना मतदारांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचे निकालातून दिसले. पक्षाऐवजी व्यक्तीनिष्ठ राजकारणाला सिन्नरकर प्राधान्य देतात, हे या निवडणुकीतही प्रकर्षाने दिसून आले.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नगराध्यक्षपदासाठी सालस व सर्वमान्य चेहरा म्हणून विठ्ठलराजे उगले यांना पुढे केल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. याशिवाय मराठा मतांचा वाढता टक्का आणि कोकाटे यांची विकासाची साद त्यांना विजयाकडे घेवून गेली.
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची जबाबदारी कोकाटे यांच्यावर असल्याने त्यांना सिन्नरमध्ये मर्यादित वेळ देता आला. मात्र त्यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी शहरात ठाण मांडत घराघरांत प्रचार केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. खासदार राजाभाऊ वाजे यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अंतिम टप्यात खासदार वाजे, ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे तसेच दीप्तीताई वाजे यांनी प्रचारात लक्ष घातल्याने उबाठा गटाचे १४ नगरसेवक निवडून आले, प्रभाग क्रमांक ११ मधील दोन, प्रभाग ७ मधील दोन आणि प्रभाग २ मधील एक जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेण्यात वाजे गट यशस्वी ठरला. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी करण्यात त्यांना अपयश आले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १, २, ४, ५, ६, ८, १२ व १३ या आठ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले. सुज्ञ मतदारांनी जाणीवपूर्वक मतदान केल्याने अनेक दिग्गजांना फटका बसला. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या वंदना गोजरे अवध्या एका मताने पराभूत झाल्या. विशेष म्हणजे या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल उगले आणि नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब उगले यांना मात्र भरघोस मते मिळाल्याचे चित्र दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून अध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाली असतानाही ४ नंबरच्या प्रभागातून पुतण्या शुभम यालाही उमेदवारी मिळावी यासाठी नामदेव लोंढे आग्रही होते. मात्र सागर भाटजिरे या तरुणाला उमेदवारी देण्यासाठी कोकाटे यांनी लोंढे यांचे पुतण्या प्रेम झिडकारले, त्यातूनच कोकाटे यांना सोडचिठ्ठी देत नामदेव लोंढे रातोरात शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिन्नरमध्ये सभा होऊनही नामदेव लौटे याना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. पक्षाची संघटनात्मक ताकद कमी असल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाहीं. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी ते स्वतः तर प्रभागातून पुतण्या पराभूत झाला. त्यामुळे त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर लोडे घराण्याचा एकही सदस्य नगरपालिकेत दिसणार नाही. त्यामुळे त्यांची अवस्था तेल गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले अशी झाली आहे.
भाजपाचे उदय सांगळे यानी प्रयत्नांची शिकस्त केली तरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे चौथ्या क्रमांकावर राहिले, मात्र प्रभाग क्रमांक १० मधून आशा कर्पे आणि अनिल सरवार या दीन जागा भाजपाला मिळाल्याने तोच दिलासा ठरला, प्रमोद चोथवे यांच्याशिवाय वाजे घराण्याचा अन्य कुठलाही उमेदवार नाही, असे ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यानी पहिल्याच प्रचार सभेत ठासून सांगितल्याने हेमत वाजेंना त्याचा फटका बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांनी सिन्नरवर लक्ष केंद्रित करूनही त्याचा सकारात्मक परिणाम दिसला नाही. परिणामी नगराध्यक्ष पदाला गवसणी घालण्याचे हेमंत वाजे यांचे मनसुबे फोल ठरले.






