महागाईविरोधातील आंदोलन आक्रमक; सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
Fuel Price Hike Protest News Marathi : महागाई आणि सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांच्या निषेधार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना ताब्यात घेण्यात आले.
नागरिकांवर वाढत्या महागाईचा बोजा आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींच्या विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. काही कार्यकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
India’s Inflation Risk: भारतात महागाईचा धोका… कारण US-Iran तणाव नाही, तर नेमकं काय?
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन अधिक चिघळू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नवी मुंबईतील या आंदोलनादरम्यान, महिला कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) नेत्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांचा तीव्र निषेध करत रस्त्यावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजली. नेत्यांनी आरोप केला की, “घरगुती गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किमती, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन कठीण झाले आहे.”
आंदोलन सुरू असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड वाद झाला. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. परिस्थिती चिघळल्याने, पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड आंदोलनात उपस्थित होते. पोलिसांनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. महागाईच्या या मुद्द्यावर शरद पवार गटाने आपली संपूर्ण ताकद मैदानात उतरवल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. नेत्यांच्या अटकेनंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापले असून, त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात.
“सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळत असताना सरकार मात्र मग्रूर बनले आहे. जनतेचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे, पण आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा ताब्यात घेण्यापूर्वी नेत्यांनी दिला.






