कुटुंब म्हणून आम्ही एकच (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
बारामती/ अमोल तोरणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघांमध्ये एक लाख आठ हजार मताधिक्याने विजय मिळवल्याने त्यांना हक्काचा जनाधार कायम जपण्यात यश आले आहे. लोकसभा निवडणुकीतील अनुभवामुळे सावध भूमिका घेऊन केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे अजित पवार यांचा विजय सुकर झाला.
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने ती निवडणूक संपूर्ण देशात गाजली होती. राष्ट्रवादीतील दुहीमुळे या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होतोय की काय, अशी शक्यता होती. शरद पवार यांना डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी सुप्रिया सुळे यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना फारसे मताधिक्य मिळणार नाही, अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना या विधानसभा मतदारसंघातून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी खरंतर ही धोक्याची घंटा होती. त्यामुळे या निकालाने सुरुवातीला उद्विग्न झालेल्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती.
मात्र बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी लाखो पत्रे पाठवून त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यांचा गाड्यांचा ताफा देखील अडवून कार्यकर्त्यांनी हा आग्रह धरला. यानंतर अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राजकीय रणनीती बदलली. बारामती शहर व तालुक्यातील प्रत्येक भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क सुरू केला. त्यातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यपदी संधी मिळाल्याने त्यादेखील पूर्ण ताकतीने सक्रिय झाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेल्या त्रुटी या विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील जनतेने सुप्रिया सुळे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता, ती जनता विधानसभेला आम्ही अजित दादांना साथ देणार असल्याचे सांगत होते. या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणेमध्ये हाच मुद्दा मांडला जात होता. स्वतः अजित पवार यांनी देखील प्रचार सभांमध्ये बोलताना या मुद्द्यावर भर दिला. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बारामती शहर व तालुक्यामध्ये या पाच वर्षात करण्यात आलेली ९००० कोटींची विकास कामे ही अजित पवारांसाठी सर्वात मोठी जमेची बाजू होती. या विकास कामांची माहिती विविध प्रचार सभांमधून तसेच इतर माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला. त्यातच अर्थमंत्री म्हणून त्यांनी घोषित केलेली लाडकी बहीण योजना प्रभावीपणे बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवली. राष्ट्रवादीचे तीन मोठे मिळावे बारामती मध्ये आयोजित करून आपल्या विकास कामांची माहिती तसेच राज्यात सुरू केलेल्या योजनांची माहिती अजित पवार यांनी दिली. या सभांना महिलांची मोठी उपस्थिती होती. त्यामुळे साहजिकच आपले व्हिजन व केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यात ते यशस्वी झाले.
सर्व समाज घटकांशी ठेवला संपर्क
राज्यात इतर ठिकाणी असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक वेळा त्यांना निवडणूक काळात जावे लागत होते. मात्र तरीदेखील ही कसरत करत पूर्ण लक्ष आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात ठेवून अजित पवार पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय हालचालींची माहिती घेत होते. या विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाचा फटका बसू नये, याची पुरेपूर खबरदारी अजित पवार यांनी घेतली. या समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती अनेक वेळा त्यांनी दिली. मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या घटकातील प्रत्येक कुटुंबीयांशी संपर्क ठेवून अजित पवार यांच्या कामांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर इतर सर्व समाज घटकांशी स्वतः खा.सुनेत्रा पवार यांनी संपर्क ठेवला. पार्थ व जय पवार हे दोन्ही चिरंजीव देखील पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये होते. अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील व डॉ रजनी इंदुलकर यादेखील प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय होत्या.
शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका पूर्णपणे टाळण्यात आली. स्वतः अजित पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका होऊ नये, याची काळजी घेतली. जिरायती भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी केलेल्या निधीची तरतूद याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली. जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या कऱ्हा – नीरा नदीजोड प्रकल्प ही प्रस्तावित योजना या निवडणुकीनंतर अमलात आणण्याचे आश्वासन त्यांनी जिरायती भागातील जनतेला दिले.
विकास कामांच्या मुद्द्यावर भर
युगेंद्र पवार यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ताकद असल्याने अजित पवार यांच्यासाठी हे मोठे आव्हान होते. मात्र कोणतीही टीकाटिप्पणी न करता विकास कामांच्या मुद्द्यावर भर देऊन अजित पवार यांनी संवेदनशीलपणे ही निवडणूक हाताळली. दरम्यान बारामतीमध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैशांचे जोरदार वाटप होणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला. असा प्रकार न घडल्याने निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. साहजिकच ७१ टक्के मतदान झाले. त्यामुळे वाढलेल्या टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर मतमोजणीच्या सुरुवातीपासून अजित पवार यांनी मोठी आघाडी घेत एक लाखाहून अधिक मताधिक्याचा विक्रम केला.