मुंबई : वरळी कोळीवाड्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा (Rally) झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही लोक उठून जात होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान केले. ‘वरळीमध्ये जंगी सभा झाली. भव्य सभा झाली. मी पण पाहिली, माध्यमांनी पण दाखवली’, असे म्हणत टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान लोक उठून जात असल्याचा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला होता. त्यावर अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ‘वरळीमध्ये जंगी सभा झाली, भव्य सभा झाली. मी पण पाहिली, माध्यमांनी पण दाखवली. सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा झाली. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत.’
आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेकीच्या घटनेवर मी निषेध व्यक्त करतो. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. विरोधक असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, कोणत्याही पक्षाचे नेते राज्यात फिरत असताना आदर दिला पाहिजे. विचारधारा वेगळी असू शकते, विचारांचा सामना विचारांनी करावा. पण हे दगडं मारणं, शाई फेकणं किंवा हिंसा करणं योग्य नाही. अहिंसेच्या मार्गाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीच करु नये’, असे त्यांनी सांगितले.
…तरी समर्थन करणार नाही
आदित्य ठाकरे त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. काहींना बघवत नाही. सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता लोकांसाठी काम करायचे असते, असा रडीचा डाव खेळायचा नसतो. महाराष्ट्रातील लोकांना हा रडीचा डाव आवडत नाही. जे कुणी असे करत आहेत, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आमच्या पक्षातील लोकांनी देखील असे केले तरी त्याचे समर्थन मी करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.