मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा खळबळ उडवली आहे. (Nitin Desai Suicide Case) त्यानंतर या प्रकरण विधानसभेतसुद्धा याचे पडसाद उमटले. सर्वच नेत्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाची तातडीने दखल घेत मोठी तपास यंत्रणा राबवली आहे. आता यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी कोण कोण या प्रकरणात सापडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (nitin desai suicide case filed against five people shocking information of nitin desai recorded audio clip surfaced)
नराधमांनी माझा स्टुडिओ लुटला…
दरम्यान, नितीन देसाईंच्या रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशेष शाह, स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल या नराधमांनी मला पैशांच्या धमक्या देऊन माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. माझ्या विरोधात षडयंत्र रचले आणि मला संपविले, असे गंभीर आरोप नितीन देसाई यांनी केले आहे. एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं (Rashesh Shah) माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला, असं देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सगळ्याचा तपास खालापूर पोलीस सध्या करत आहेत.
पाच जणांवर गुन्हा दाखल…
खालापूर पोलिसात नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यात पाच जणांची नावं आहेत. एडलवाईज कंपनीचे सीईओ रसेश शहा, चेअरमन केयूर मेहता, स्मित शाह, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांच्या विरोधात एफआयआरची नोंद आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टला आत्महत्या करण्यापूर्वी देसाईंनी वृंदा नावाच्या वकिलाला काही व्हॉईस क्लिप पाठवण्यासाठी त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला होता.
11 ऑडिओ क्लिप सापडल्या
अलीकडेच पोलिसांनी नितीन देसाई यांच्या खोलीतून एक व्हॉईस नोट जप्त केली असून, आता 11 ऑडिओ क्लिप सापडल्या होत्या. पोलीस आता या 11 ऑडिओ क्लिपच्या आधारे तपास पुढे करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ऑडिओ रेकॉर्डर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
माझा स्टुडिओ गिळण्याचे काम
रशेष शहा हा गोडबोल्या असून त्याने छोटया मोठया उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडिओ गिळण्याचे काम केले. त्याला 100 फोन केले परंतु फोन उचलत नाही. EOW, NCLT DRT यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन- तीन इनव्हेस्टर गुंतवणुक करण्यासाठी तयार असताना मला सहाकार्य केले नाही. माझ्यावर दुप्पच तिप्पट किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर करून मी दिलेल्या गोष्टी मान्य करत नाहीत. असं नितीन देसाई ऑडिओ क्लिपमध्ये म्हणालेत.
एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून
एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचले आणि मला संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी मला टोकाचे पाऊस उचलण्यास भाग पाडले, असे नितीन देसाई म्हणाले. तसेच स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझी नाचक्की करून मला बदनाम करुन माझ्यावर दबाव आणला. माझा स्टुडीओ लुटण्याचे काम केल, या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. अशी धक्कादायक माहिती देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलीय.