सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये प्यायला पाणी नसल्याचे समोर आले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : सातारा : गुन्हेगारांवर बहिरी ससाण्यासारखी नजर ठेवणारे आणि धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जाणारे सातारा तालुका पोलीस ठाणे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. ते म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत सुविधेचा अभाव. (Maharashtra Police)
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली या ठाण्याने अलीकडच्या काळात अनेक ठळक कारवाया केल्या आहेत. अवैध वाहतुकीवर कारवाई, मनुष्यवधातील फरार आरोपींचा शोध, तसेच तालुक्यातील दुर्गम भागात होणाऱ्या रेव्ह पार्टींवर धाड या सर्वांमुळे ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. गुन्हेगारीवर लगाम घालण्यात ठाण्याने आक्रमक भूमिका घेतली असली, तरी स्वतःच्या आवारातील मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते.
हे देखील वाचा : सहकार क्षेत्राला बळकटी! साताऱ्यात प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले राहणार उपस्थित
ठाण्याची इमारत आणि परिसरातील वृक्षसंपदा यामुळे वातावरण प्रसन्न वाटते. मात्र या हिरवळीच्या आड एक गंभीर समस्या दडलेली आहे. ठाण्यात दोन कुलर यंत्रणा असूनही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. नळ कनेक्शन असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अधिकारी, कर्मचारी आणि ठाण्यात येणारे नागरिक यांना बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
विशेषतः उन्हाच्या तीव्रतेत नागरिक, वकील, पक्षकार यांची ठाण्यात मोठी वर्दळ असते. अशा वेळी किमान थंड पिण्याचे पाणी उपलब्ध असावे, ही अपेक्षा रास्त असतानाही प्रत्यक्षात ‘जार संस्कृती’वर ठाणे चालत असल्याचे दिसते. कुलर निष्क्रिय आहेत, आणि पाणी संपल्यावर समोरील हॉटेलमधून बाटल्या आणण्याची वेळ येते. ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवणारी आहे.
हे देखील वाचा : साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन
नगरपालिकेच्या वतीने शिवतेज हॉल आणि पोलीस ठाण्याला नळजोडणी दिली गेल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात पुरवठा का होत नाही, याचे स्पष्ट उत्तर मिळत नाही. ही जबाबदारी नेमकी कोणाची पालिका की संबंधित यंत्रणा? याचा उलगडा होणे आवश्यक आहे.
गुन्हेगारीवर कठोर कारवाई करणाऱ्या यंत्रणेची स्वतःची पायाभूत सुविधा एवढी कमकुवत असणे, हा एक गंभीर विरोधाभास आहे. “धडाकेबाज तपास… पण प्यायला पाणी नाही,” ही स्थिती केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षाची नव्हे, तर नागरिकाभिमुख सेवांतील तुटवड्याचीही जाणीव करून देते. सातारा तालुका पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला किमान पिण्याचे स्वच्छ पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना होणे, हीच सध्या सर्वांची माफक पण रास्त अपेक्षा आहे.






