मुंबई : तीन मुले असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या अध्यादेशाची प्रती व प्रतिज्ञापत्र सामान्य प्रशासन विभागाकडून दाखल करण्यात आले. 31 डिसेंबर 2001 नंतर ज्या पोलिसाला तिसरे अपत्य झाले आहे, त्याला हा नियम लागू होतो, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. तर सामान्य प्रशासन विभागाचा हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो लागूच होत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील दिनेश अडसुळे यांनी केला. आम्ही याबाबत सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
अनुकंपा नोकरी कोणाला देता येईल याचे निकष सांगणारा अध्यादेश 28 मार्च 2001 रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढला. तीन अपत्य असलेल्या पोलिसाचा कोणताच वारस अनुकंपा नोकरीसाठी पात्र नाही, असे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अध्यादेश सर्व पोलिसांना ज्ञात आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तर याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी यावर आक्षेप घेत अध्यादेश सरकारकडून प्रसिध्द करण्यात आला नाही. त्यामुळे लागू होत नसल्याचे कोर्टाला सांगितले.
प्रकरणाचा सारांश; अध्यादेश प्रसिद्धच नाही
पोलीस नाईक सुनील अहिरे यांचे 18 फेब्रुवारी 2013 रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा नोकरी मिळावी यासाठी विद्या सुनील अहिरे व मनीष सुनील अहिरे यांनी अॅड. दिनेश अडसुळे यांच्या मार्फत ही याचिका केली आहे. 1994, 1996 व 2001 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानुसार पोलिसाच्या वारसाला अनुकंपा नोकरी देता येते. मनीषला अनुकंपा नोकरी द्यावी, असा अर्ज प्रशासनाकडे करण्यात आला. पोलिस खात्याने अनुकंपा नोकरी नाकारली. तसेच मॅटने अनुकंपाचा दावा नाकारला. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.