Pune Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला प्रशांत जगतापांचा विरोध; शरद पवार घेणार मोठा निर्णय?
यासंदर्भात बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा नव्याने उभा केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली, तर शरद पवार गटाला त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याउलट, अजित पवार यांच्यासोबत युती करून निवडणूक लढविल्यास पक्षाचे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असेल, तर आपण पक्षातून बाहेर पडण्यास तयार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
आपण अद्याप कोणताही राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट करताना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास आपण केवळ शहर अध्यक्षपदाचाच नव्हे, तर शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊ, असे प्रशांत जगताप यांनी ठामपणे सांगितले. या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील काही तासांत यावर तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Political News)
दरम्यान आज दुपारी १२ वाजता शरदचंद्र पवारांच्या पक्षाच्या मुंबई प्रदेशची बैठक होणार आहे. त्यातच कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंना आजच कळवले जाईल. पण सध्या तरी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून त्यातून योग्य मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याच्या चर्चां सुरू झाल्यावर प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आगामी निवडणुकीत आमचे उमेदवार केवळ आणि केवळ ‘तुतारी वाजवणार माणूस’ याच चिन्हावर लढततील. ते पुन्हा वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. असं स्पष्ट केलं होतं. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्याला वैयक्तिक आकस, शत्रुत्त्व किंवा द्वेषाची भावना नाही. मी २४ वर्षे अजितदादांच्या हाताखाली काम केलं आहे. त्यांनी माझा कधीही अपमान केला नाही. पण दोन प्रभागांच्या अॅडजस्टमेंट’साठी आपण संपूर्ण शहराचे युनिट संपवणे मला मान्य नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच ही केवळ भूमिका नाही तर पुण्यातील सुसंस्कृत आणि पुरोगामी राजकारणासाठी घेतलेला पवित्रा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.






