अजित पवार (संग्रहित छायाचित्र,फोटो-ट्विटर)
पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील, देशांमध्ये सामाजिक ऐक्याचे वातावरण खराब झाले आहे. धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक तेढ वाढवण्याचे काम काही जणांकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. गणेश उत्सवाच्या निमित्ताने दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.
पुणे फेस्टिव्हलच्या उदघाटन समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ” मागील काही दिवसांमध्ये राज्यातील, देशांमध्ये सामाजिक ऐक्याचे वातावरण खराब झाले आहे. धार्मिक, जातीय, प्रांतिक, भाषिक तेढ वाढवण्याचे काम काही जणांकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाता कामा नये. असे कृत्य करणाऱ्याला रोखलं पाहिजे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्या हेतूला हा उत्सव साजरा करताना बाधा येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
(फोटो – टीम नवराष्ट्र)
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. हा कार्यक्रम सर्वांचा आहे. हा उत्सव साजरा होत असताना या उत्सव काळामध्ये सामाजिक भान ठेवायला हवे. आनंद साजरा करत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खबरदारीने वागायला हवे. गणेश बुद्धीची देवता आहे, बुद्धीचा वापर करून गणेश उत्सव साजरा करायला हवा. दुःख वाटल्याने कमी होते आनंद वाटल्याने तो वाढतो असे आपली भारतीय संस्कृती शिकवते,त्याप्रमाणे आपण आचरण करायला हवे.
पर्यावरण पूरक साजरा करा
मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. त्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. पहिल्या पाच शहरांमध्ये पुणे शहराचाही प्रदूषणामध्ये नंबर लागतो. गणेशोत्सवात शाडूंच्या मूर्तीचा वापर करायला हवा. गणेशोत्सवात मिरवणुका डीजे विरहित काढायला हव्यात, असे अजित पवार म्हणाले. सर्व पोलिसांवर सोडून चालत नाही. आपणही शिस्त पाळली पाहिजे. मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात गाणे लावणे बंद करायला हवे. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर वाढवायला हवा, असे उपुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.