सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंचर : कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेल्या डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावरील पाणी गळती होत आहे. याबाबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदनाद्वारे तातडीने लक्ष वेधण्यात आले. धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
धरण सुरक्षा पुनर्विलोकन समिती आणि सीडब्लूपीआरएस, पुणे यांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातून सध्या सुमारे १४०० लिटर प्रति सेकंद इतकी प्रचंड गळती होत आहे. या गळतीमुळे धरणातील सिमेंट बाहेर पडत आहे. यामुळे धरणाची संरचनात्मक मजबुती धोक्यात येण्याची शक्यता आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणाचे बळकटीकरण करणे तातडीचे असल्याचे वळसे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
१७१.५९ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित
डिंभे धरणाच्या दुरुस्ती व बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने १७१.५९ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा व प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित आहे.
प्रमुख मागण्या काय?
धरण सुरक्षा कायदा २०२१ च्या तरतुदींनुसार, धरणाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रलंबित प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा. पावसाळ्यापूर्वी आणि पुढील संभाव्य हानी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू कराव्यात.
…तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो
“डिंभे धरण हे या परिसराची जीवनवाहिनी आहे. धरणातून होणारी गळती ही केवळ तांत्रिक बाब नसून ती सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने आणि शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी वळसे पाटील यांनी केली आहे.”






