कडक उन्हामुळे उत्पादन घटले; जुन्नरमधील शेतकरी चिंतेत, पेरणीही वाढली मात्र...
आळेफाटा : उन्हाळी बाजरीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी यंदा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. ऊसतोडणी लवकर पूर्ण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊसाच्या वावरात रोटर मारून मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरीची पेरणी केली होती. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यात पडलेल्या कडक उन्हामुळे बाजरीच्या फुलोऱ्याचा गळ मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक ठिकाणी कणसे पूर्णपणे भरली नसल्याने उत्पादनात घट झाली. त्यातच हंगामाच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने दोन ते तीन वेळा जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे आणखी नुकसान झाले. काही भागांत बाजरी आडवी पडली तर काही ठिकाणी फुलोरा खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अडचणींचा सामना करत शेतकरी पिके वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले.
Satara News : शेतकऱ्यांसाठी दिलासा ! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध
सध्या तालुक्यात कापणी व कुडणीची कामे वेगाने सुरू असून, पुढील सात ते आठ दिवसांत उन्हाळी बाजरीचा हंगाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पिकाच्या उत्पादनात आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग असून, अनेक ठिकाणी ते निम्मा किंवा तृतीयांश वाट्याने शेतीची कामे सांभाळत असल्याचे दिसून येते. काही शेतकरी स्वतः शेतात मुक्काम ठोकून पिकांची राखण करत आहेत.
बाजारपेठेत सध्या बाजरीला प्रतिकिलो २५ ते ३५ रुपये दर मिळत असला तरी वाढलेला उत्पादन खर्च, डिझेलचे चढे दर आणि मळणी यंत्रांच्या वाढलेल्या भाड्यामुळे आर्थिक गणिते बिघडली आहेत. अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने हातात राहणारा नफा कमी होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
कडक उन्हामुळे उत्पादनावर होतोय परिणाम
शेतकरी राजेश कणसे, शिवाजी डुबरे, चंद्रकांत घोडके यांनी सांगितले की, यंदा लागवड क्षेत्र वाढले असले तरी कडक उन्हाळा आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मेहनतीच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे.






