संग्रहित फोटो
आळेफाटा : वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित भाव, अपुरा वीजपुरवठा आणि नैसर्गिक संकटांच्या छायेमुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा आणि किमान आधारभूत किंमत (MSP) कायद्याने बंधनकारक करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सध्या रासायनिक खते, औषधे, बियाणे, डिझेल आणि मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. मात्र त्यानुसार शेतीमालाचे दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कांदा, टोमॅटो, सोयाबीन, फ्लॉवर, कोबी, केळी यांसारख्या नगदी पिकांमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करूनही उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरवर्षी पीक हातात आल्यानंतर बाजारात अचानक दर कोसळतात. व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळत नाही. अनेकदा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. सरकारकडून मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास मोठा विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असून ग्रामीण भागात लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत तांत्रिक बिघाडामुळे मोटारी जळणे, पंप बंद पडणे तसेच घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत.
डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टर, फवारणी, पाणीपुरवठा आणि वाहतूक यासाठीचा खर्च वाढल्याने शेती परवडेनाशी झाली आहे. काही शेतकरी कर्ज काढून शेती करत आहेत मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे.
उच्च शिक्षणाची स्वप्ने अर्धवट
ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे जीवनमान खालावत आहे. मुलांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत असून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची स्वप्ने अर्धवट सोडावी लागत आहेत. दैनंदिन गरजा भागवणेही अनेकांसाठी कठीण बनले आहे.
“आज शेती हा व्यवसाय नसून जुगार बनला आहे. हवामान, बाजारभाव आणि खर्च यांचा ताळमेळ राहत नाही. सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला नाही, तर भविष्यात शेती करायला कोणी तयार राहणार नाही.” -गणेश गडगे, शेतकरी.
शेतकऱ्यांचे जगणे कठीण
“शेतकरी पूर्ण भांडवल शेतीत गुंतवतो; पण शेवटी उत्पादन खर्चही वसूल होत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने केवळ घोषणा न करता हमीभावासाठी कायमस्वरूपी कायदा करणे गरजेचे आहे,” अशी भावना शेतकरी विशाल गडगे यांनी व्यक्त केली.
“वीजपुरवठा आणि बाजारभाव या दोन मोठ्या समस्या आहेत. पिकांना पाणी द्यायचे तर लाईट नाही, आणि पीक विकायला नेले तर भाव नाही. त्यामुळे शेतकरी मानसिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी खचत चालला आहे.” — नवनाथ वाळुंज, शेतकरी.






