आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नारळाचे झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, दोन महिला जखमी
मंचर : चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी गारांच्या पावसाने चांडोली बुद्रुक परिसरात मोठी दुर्घटना घडली. घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेलेल्या ७० वर्षीय शेतकरी हरिभाऊ रघुनाथ थोरात यांच्यावर नारळाचे झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली गेली. दुसऱ्या घटनेत, सुलाबाई काशिनाथ सुकाळे (वय ७५) व शांता अर्जुन थोरात (वय ५५) या दोन महिला जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी हरिभाऊ थोरात हे घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गेले होते. त्याच वेळी शेजारील नारळाचे झाड उन्मळून पडले आणि झाडासह पत्र्याचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या हरिभाऊ थोरात यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली. त्यांचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. कुऱ्हाडीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून आणि पत्रे बाजूला करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जवळपास अर्धा तास चाललेल्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आले.
मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; यंदाचा मान्सून कमकुवत राहणार, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्या प्रीती प्रवीण थोरात, बाजार समिती संचालक संदीप थोरात, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रवीण थोरात पाटील, पोलीस पाटील सुजाता थोरात, सामाजिक कार्यकर्ते अक्षय खरमाळे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. हरिभाऊ थोरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, सून व नातवंडे असा परिवार आहे.
चांडोली गावाचे मोठे नुकसान
“हरिभाऊ थोरात हे कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने चांडोली गावाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी असून, संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे,” असे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात यांनी सांगितले.
यंदाचा मान्सून कमकुवत राहणार
भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अद्ययावत दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरातील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अंदाजात चार टक्के त्रुटीची मर्यादाही नमूद करण्यात आली आहे.






