सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे, ढाबे, खानावळी, मिठाईची दुकाने, बेकरी, ज्यूस सेंटर तसेच रस्त्यावरील पाणीपुरीच्या गाड्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्व अन्नसेवा आस्थापनांची सोमवारपासून अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) अचानक तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान अन्न परवाना, स्वच्छता, अन्नातील भेसळ, खाद्यतेलाचा पुनर्वापर, अन्न साठवणुकीची पद्धत, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, तापमान नियंत्रण तसेच ग्राहकांना मोफत पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाते की नाही, याची कसून तपासणी केली जाणार आहे. बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
यापूर्वी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छ व कीटकग्रस्त स्वयंपाकगृहे, वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर, परवाना नसणे, चुकीचे पॅकेजिंग, तापमानातील त्रुटी तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचे प्रकार आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर व जिल्ह्यात सोमवारपासून अचानक तपासणी मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्नसेवा आस्थापनावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. सोमवारपासून ही मोहीम शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे,” असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) दिगंबर भोगावडे यांनी सांगितले.
दरम्यान, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गुरुवारी हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, ढाबा, मिठाई दुकाने व ज्यूस सेंटर चालकांच्या विविध संघटनांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस ४१ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अन्न परवाना घेणे, स्वच्छ व सुरक्षित अन्नाची विक्री करणे तसेच ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती न करता मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात
“राज्यातील सर्व भागांत बैठका घेऊन ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत नियमांचे काटेकोर पालन करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. लहान हॉटेल्स व उपाहारगृहांनाही जागेच्या मर्यादा असल्या तरी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. याबाबत सर्व प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी गणेश शेट्टी यांनी दिली.






