ओरल कॅन्सरची लक्षणे कशी ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)
मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. परंतु अनेकदा या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेदनारहित किंवा किरकोळ वाटत असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कर्करोगाचा प्रसार होऊन उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि रुग्णाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉ. अमित चक्रवर्ती, हेड अँड नेक ऑन्को सर्जन, SSO हॉस्पिटल, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.
भारतीय पुरुषांमध्ये Oral Cancer चा अधिक धोका, 5 लक्षणांवरून ओळखा
काय आहेत लक्षणे
तोंडामध्ये दोन आठवड्यांहून अधिक काळ न भरून येणारी जखम किंवा अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, गालाच्या आतील बाजूस गाठ किंवा जाडी वाढल्यासारखे जाणवणे, सतत वेदना होणे, चावण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, दात सैल होणे, तोंडात बधिरपणा जाणवणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. आवाजात बदल होणे, सतत घसा दुखणे किंवा मानेवर सूज अथवा गाठ जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा किंवा पानमसाला चघळणे, नियमित मद्यपान करणे आणि मौखिक स्वच्छता न राखणे यामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मात्र, व्यसन न करणाऱ्या व्यक्तींनाही मौखिक कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे.
काय करावे जाणून घ्या
मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे, मद्यपानावर नियंत्रण ठेवणे, मौखिक स्वच्छता राखणे, आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे तसेच नियमितपणे दंतवैद्यांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय दर महिन्याला स्वतः मौखिक आरोग्याची तपासणी करण्याची सवय लावावी. तोंडात न भरून येणाऱ्या जखमा, लाल किंवा पांढरे चट्टे अथवा इतर कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास यशस्वी उपचार करतात येतात आणि रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो.
केवळ सडलेल्या दातांनीच नाही तर घाण साचल्यानेही होऊ शकतो Cancer, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष






