बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांचा माफीनामा,
बारामती, प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर,वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बारामती नगरपालिकेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी अखेर पत्रकार परिषदेत सार्वजनिक माफी मागितली आहे. अनावधानाने आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत समस्त बारामतीकर, अजितदादा पवार यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची हात जोडून क्षमा मागितली.
“माझ्याकडून गेलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे होते. त्याबद्दल मला मनस्वी खेद आणि पश्चाताप होत आहे. माझ्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वांची मनापासून माफी मागतो,” असे मासाळ यांनी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असून नगरसेवक पदाचा मात्र राजीनामा देणार नाही, कारण बारामतीतील जनतेने मला बिनविरोध निवडून दिले आहे, त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अजितदादांच्या स्मृतीस्थळावर दि ९ जून रोजी आत्मकेश म्हणून एक दिवस अन्नत्याग करून बसणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यासंदर्भात किशोर मासाळ म्हणाले,”बारामतीकरांच्या भावना स्वाभाविक आहेत. मात्र, माझ्या वक्तव्याच्या आडून काहीजण राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषयाचे अनावश्यक राजकारण केले जात आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. मला अद्याप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार किंवा पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी कडून कोणताही आदेश मिळालेला नाही.२०२९ च्या विधानसभा निवडणुकी मधील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा गुलाल अंगावर पडेपर्यंत, मी पवार कुटुंबासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत विचारले असता, हि न्याय प्रविष्ट बाब असल्याचे सांगून या विषयावर बोलण्यास त्यांनी टाळले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर टिपा टिपणी करत मला धमक्या दिल्या जात असून, यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप किशोर मासाळ यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी येऊन मी २०२९ ची विधानसभा निवडणूक बारामतीमधून लढवणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे, त्यावेळी मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, असे किशोर मासाळ यांनी सांगितले.






