'सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आदरणीय अजितदादांचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, शेती, सहकार आणि ग्रामीण विकासासाठी समर्पित होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून दादांची शेतकरी कल्याणाची तळमळ हीच आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने आयोजित ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’ शुभारंभ आणि ‘आदर्श शेतकरी सन्मान सोहळा’ प्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने आणि नव्या ऊर्जेने शेती करेल, हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे. महायुती सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवून बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध केलेल्या यादीव्यतिरिक्त पुढील टप्प्यांत आणखी पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल, ज्यामुळे पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेल.
उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, “हा सन्मान केवळ काही व्यक्तींचा नसून जिद्दीच्या व परिश्रमाच्या बळावर शेतीमध्ये यश मिळवणाऱ्या प्रत्येक बळीराजाचा आहे. बळीराजा हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ आहे. शेतकरी सक्षम झाला तरच महाराष्ट्र सक्षम होईल, हे दादांचे विचार पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी आगामी काळातील उपक्रमांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, “आदरणीय अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनातर्फे २२, २५ आणि २६ जुलै दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या लोककल्याणकारी मोहिमेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जनजागृतीच्या माध्यमातून सक्रिय सहकार्य करावे.” तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २२ ते २८ जुलै दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ राबवला जात असून विविध सामाजिक उपक्रमांतून जनतेशी नाळ अधिक दृढ केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्या म्हणाल्या की, “दादांनी ज्या विश्वासाने आणि प्रेमाने या बँकेला घडवले, तो सहकाराचा वारसा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अजितदादांची विकासाची दृष्टी आणि शेतकरी कल्याणाची तळमळ कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.






