FDA चा दणका; 12 हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी कारवाई करत अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एफडीएने १८ आणि २१ जुलै रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, खेड तसेच सातारा जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली. तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड, पंढरपूर आणि वडूज येथील काही आस्थापनांवर छापे टाकून गुन्हेही दाखल करण्यात आले.
कोणत्या आस्थापनांवर कारवाई?
पुणे व पिंपरी-चिंचवड : हॉटेल लोकप्रिय (मार्केट यार्ड), जय सद्गुरू इराणी चहा अँड स्नॅक्स सेंटर (मार्केट यार्ड), फोक्लो टेक्नोलॉजी प्रा. लि. (बावधन), स्वीस्टा ईएनटी एंटरप्रायझेस प्रा. लि. (औंध) आणि अक्सा बेकरी (आदर्शनगर).
पुणे जिल्हा : टोणी दा ढाबा (कामशेत, मावळ), फाउंटन प्युअर व्हेज (आळेफाटा, जुन्नर) आणि केएम फुड्स (वरची भांबुरवाडी, खेड).
सातारा जिल्हा : शालिमार उडपी व्हेज रेस्टॉरंट आणि सुरभी हॉटेल अँड बार (वडूज, खटाव).
एफडीएने नागरिकांना निकृष्ट, अस्वच्छ किंवा दिशाभूल करणाऱ्या अन्नपदार्थांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केले असून १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुधाच्या उत्पादनात घट
दुधात पाणी मिसळूनही न थांबलेला भेसळीचा खेळ आता थेट रासायनिक पदार्थांपर्यंत पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे “दूध उत्पादन घटले की आतापर्यंत दुधाच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ थांबली?”
दूध घटले की भेसळ थांबली? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या संकलनात घट






