हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संताप (संग्रहित फोटो)
नीरा : बेलसर टोलनाका व्यवस्थापन आणि पीएमपीएल प्रशासन यांच्यात टोल शुल्काच्या आर्थिक वादाचा फटका अखेर सर्वसामान्य प्रवाशांना बसला. हडपसर-जेजुरी-नीरा मार्गावरील पीएमपीएलच्या बसफेऱ्या गुरुवारी दिवसभर अचानक बंद ठेवण्यात आल्याने हजारो नियमित प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा बंद करण्यात आल्यामुळे पीएमपीएलच्या नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभाराविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणानंतर जेजुरीजवळ बेलसर येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर गेल्या दोन महिन्यांपासून टोल वसुली सुरू आहे. या मार्गावर धावणाऱ्या पीएमपीएल बसांना अल्प अंतरासाठीही मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागत असल्याने हा आर्थिक भार असह्य ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी टोल व्यवस्थापन आणि पीएमपीएल प्रशासन यांच्यात चर्चा होऊन सवलतीच्या दरात बस सोडण्याचा तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. त्यासाठी पीएमपीएलने प्रवाशांच्या तिकिटामागे एक रुपया अतिरिक्त आकारण्यासही सुरुवात केली होती.
दरम्यान, गुरुवारी पुन्हा टोल शुल्काच्या आर्थिक बोलणीत तिढा निर्माण झाल्याने संबंधित व्यवस्थापनाने बससेवा रोखल्याचे समोर आले. या वादात प्रवाशांचा काहीही संबंध नसताना त्यांनाच वेठीस धरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बससेवा बंद राहणार असल्याची पूर्वसूचनाही नाही
हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा या मार्गावरील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. अनेकांना खासगी वाहनांचा खर्च सोसावा लागला, तर काहींची महत्त्वाची कामेही खोळंबली. विशेष म्हणजे, बससेवा बंद राहणार असल्याची साधी पूर्वसूचनाही पीएमपीएलने दिली नाही. त्यामुळे बसस्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेकडून अशा प्रकारची निष्काळजी भूमिका अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
सामान्य नागरिकांवर अन्याय
टोलच्या वादावर तातडीने तोडगा काढण्याऐवजी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. टोलचा प्रश्न प्रशासनाने चर्चेतून सोडवावा; मात्र त्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे थांबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पीएमपीएल प्रशासनाने या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
राम मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या झाली कमी; दानचोरीचे प्रकरण बाहेर येताच दिसून आला फरक






