'सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही'; शरद पवारांचा अजित पवारांना टोला
बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलमध्ये थेट सामना रंगला असून त्यामुळेच ही निवडणूक विशेष चर्चेत आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना अजित पवारांना टोला लगावला आहे.
“मी ४० वर्षे विविध सरकारी पदांवर राहिलो, पण कधीच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सहभागी झालो नाही. सरकारी पदावरील व्यक्तींनी अशा निवडणुकांपासून दूर राहिलं पाहिजे. कारण जर कारखान्याचा प्रमुख एखादी सत्ताधारी व्यक्ती असेल, तर विरोधकांना न्याय मिळेल का, हा प्रश्न उभा राहतो,” अशा शब्दांत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ‘ब वर्ग’ गटातून अजित पवार स्वतः विजयी झाले आहेत. १०२ मतांपैकी १०१ मतं वैध ठरली असून त्यापैकी ९१ मतं अजित पवारांना मिळाली आहेत. सहकारी संस्थांनी या गटासाठी मतदान केलं आणि अजित पवारांनी येथे स्पष्ट आघाडी घेतली.
या निवडणुकीत एकूण चार पॅनेल रिंगणात होते. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार समर्थित बळीराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि अपक्ष व कष्टकरी शेतकरी समितीचे पॅनेल यांच्यात चुरस झाली. २२ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निकाल हळूहळू स्पष्ट होत असून अजित पवारांच्या पॅनेलने सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
अजित पवार ब वर्ग गटातून विजयी झाले आहेत. तरी इतर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस वोटिंग झाल्याची माहिती असून मतपत्रिका छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मात्र क्रॉस वोटिंगचा फटका नेमका कोणाला बसणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर असल्याची माहिती आहे.