(फोटो सौजन्य: Pinterest)
अनेकदा लोक नाश्त्याला वगळून चहात बिस्किटे बुडवून खाण्याचा निर्णय घेतात. याचे दुष्परिणाम अनेकांना ठाऊक नाही ज्यामुळे या सवयीचे नित्यनियमाने पालन केले जाते. चहाबरोबर अति गोड आणि प्रक्रिया केलेली बिस्किटे खाणे हानिकारक ठरू शकते. आज आपण या लेखात याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला हे काॅम्बिनेशन आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरते ते जाणून घेऊया.
अतिरिक्त साखरेचे सेवन
याचा परिणाम असा होतो की, आपल्याद्वारे अतिरिक्त साखरेचे सेवन केले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. दिवसातून अनेकदा गोड चहासोबत, गोड बिस्किटांचे सेवन केल्याने शरीरात भरपूर कॅलरीजचा साठा वाढतो. यामुळे वजन वाढते. याचा परिणाम आपल्या शरीरातील रक्तातील साखरेवरही होऊ लागतो. यामुळे मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
पोटाचे त्रास
आरोग्यासाठी धोकादायक ठरणारा यातील आणखी एक घटक म्हणजे रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैदा. बिस्किटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिफाइंड पिठात फायबर नसते. यामुळे पचनक्रिया मंदावते. दररोज नियमितपणे याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता,अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हृदयाला धोका
बिस्किटांमधील ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. हे घटक बॅड कोलेस्ट्राॅल (LDL) वाढवतात आणि चांगले कोलेस्ट्राॅल (HDL) कमी करतात. यामुळे हृदयरोगाचा धोका जास्त वाढू शकतो.
चहा-बिस्किटांची सवय मोडत नसल्यास काय करावे?
जर तुमची ही सवय तुम्हाला मोडता येत नसेल तर तुम्ही कमी साखर, जास्त फायबरने भरपूर असलेले मल्टीग्रेन बिस्किटे चहासोबत खाऊ शकता. यामध्ये साखरेचे प्रमाण मर्यादित असते. यामुळे चव आणि आरोग्य दोघांची काळजी राखली जाते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चहासोबत ड्रायफ्रुट्स किंवा काही आरोग्यदायी स्नॅक्सचाही समावेश करु शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






