संग्रहित फोटो
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा असलेल्या चाकणमधील दक्षिण महाळुंगे परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अज्ञात नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालक घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बालकाचा मृतदेह आढळून आला. शरीरावरील जखमा आणि गळा चिरलेला असल्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे व चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
तपासासाठी विविध पथके तैनात
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक ४ च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी सांगितले की, या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. या घटनेमुळे महाळुंगे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीला तातडीने अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा घराशेजारील व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार
पुर्ववैमन्यासातून घडलेल्या रक्तरंजित घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले असून, फुरसुंगीत ऐन गर्दीच्या वेळीच सहा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाच्या थरारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांमधील वादविवाद व वर्चस्वातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरूण अनिल यादव (वय २०), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१) दत्ता वेंकट गीते (वय २०) यांना तात्काळ हालचाली करीत अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य प्रकाश कांबळे याच्यासह आणखी एक आरोपी मात्र फरार झाला आहे.






