फोटो सौजन्य: गुगल
श्रीवर्धन तालुका निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. या ठिकाणचा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची कायमच पसंती असते. मात्र आता याच निसर्गाला गालबोट लागणार असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात शासनाच्या औद्योगिक प्रकल्पांना स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर आता बॅाक्साईट मायनिॅग प्रकल्पाला देखील स्थानिकांनी विरोध केला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे रवुराजे, कुरवडा, करिवणे, गुळदा मामवळी अश्या अनेक गावांच्या हद्दीमध्ये प्रदूषणकारी आणि जीवघेणा बॅाक्साईट मायनिॅग प्रकल्प स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असूनही मोठ्या प्रमाणात चालू आहे. श्रीवर्धन तालुका हा पर्यटन तालुका आहे. दिवेआगर सारखे मोठे तिर्थक्षेत्र श्रीवर्धन तालुक्यातच आहे. मुंबई पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांसाठी श्रीवर्धन समुद्रकिनारा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत मोजक्या पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने धनदाडग्यांना मोठे करण्याच्या हेतूने येथील पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे.
या प्रकल्पांमुळे सामान्य नागरिक व स्थानिक जनता त्रस्त झाली असून ,सदर मायनिंग बॅाक्साईट प्रकल्पामुळे कार्वे, भरडखोळ, आदिवासी वाडी, बोर्ली पंचतन, दिवेआगर, वाकळघर, दांडगुरी, बोरला, रसाळवाडी, नागलोली, नविवाडी, धनगरमलई, देवखोल या गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्या कारणांमुळे येत्या येत्या २० मार्चला धडक मोर्चा काढणार असल्यातचं सांगितलं जात आहे.
या प्रकल्पांमुळे गेल्या चार वर्षांत आंबे बागायतदार व काजू बागायतदार यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच उत्खनन करताना हजारो झाडांची कत्तल दिवसाढवळ्या वन्य अधिकारी यांच्या आशिर्वादाने होताना अनेकदा आढळून आले आहे. असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
यामुळेच अनेक बागायतदार व शेतकरी सुशिक्षित युवकांनी शेती व अन्य व्यवसाय करण्यास बंद करून कामासाठी शहराकडे धाव घेतली. मायनिॅग करताना मोठ्या प्रमाणात सुरूंगामुळे विषारी वायूमुळे अनेक आजार येत असतात त्याचा देखील त्रास स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे.
याचबरोबर ध्वनी प्रदूषणाचा त्रास देखील वाढत चालला आहे. याला येथील नेतृत्व व प्रशासन यांचे अभय असल्याने दिवसाढवळ्या राजरोसपणे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. या संदर्भात संबंधित विभागाचे मंन्त्री शंभूराज देसाई यांना शिवसेना व स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी निवेदन दिले असून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी देखील बेकायदेशीर मायनिॅग प्रकल्प व उत्खनन त्वरित थांबविण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या परंतु त्याला देखील न जुमानता काही ठिकाणी मायनिॅग चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व गोष्टी श्रीवर्धन तालुका प्रांत, तहसीलदार, स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून दखल न घेतल्याने येत्या गुरुवारी 20 मार्च रोजी शिवसेना पक्ष, स्थानिक ग्रामस्थ, बागायतदार, मायनिॅग प्रकल्पांमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना विश्वासात घेऊन मोर्चाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी माहिती दिली आहे.