अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (फोटो- सोशल मीडिया)
शासनाला अहवाल पाठवणार: कृषी अधिकारी रवींद्र माळी
कोकणातल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज
दष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी
खेड: तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. नुकतीच कापणीला आलेली भातशेती पावसाने पूर्णपणे उद्धवस्त केली असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. गेल्या आठवडाभरात पडणाऱ्या सरींमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताचे रोप पूर्णपणे चिखलात तुटून गेले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या पावसात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, येत्या काही दिवसांत अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षभर पुरेल इतका तांदूळ मिळवण्यासाठी भातशेती करतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने ९० टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे.
केवळ आश्वासनांवरच मानावे लागले समाधान
यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. यावेळी तरी शासन आणि लोकप्रतिनिधींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
दुष्काळ घोषित करून तातडीची मदत देण्याची मागणी
आता भातानंतर घेण्यात येणारी पावटा, तूर, कडवा आदी पिकांची पेरणीही हवामान अनुकूल नसल्याने धोक्यात आली आहे. आष्टी येथील शेतकरी वहाब सेन यांनी सांगितले की, ‘गेल्या पंधरा दिवसांच्या पावसामुळे कापलेली भातशेती चिखलात सडली आहे. या संकटातून सावरणे शेतकऱ्यांसाठी कठीण असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी.’ दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांनी कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांवर वेळ न घालवता थेट ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता
अवकाळीने हिरावला हातचा घास
खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.






