मुंबई : शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय राऊत यांचा वापर करीत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भोंगा म्हणून संजय राऊत आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. त्यामुळे आपला वापर होत असताना पक्षाचा वापर होत आहे आणि शिवसेना त्यामुळे रसातळाला चाललाय याची काळजी व आत्मचिंतन करण्याची संजय राऊत यांना आवश्यकता आहे, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज लगावला.
माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देरकर यांनी सांगितले की, दुस-याचा वापर कोण करतोय यापेक्षा आपल्या वापराने शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लागतोय याचे भान राऊत यांना आहे की नाही हे मला माहित नाही. त्यामुळे प्रथम त्यांनी पक्षाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात व आपण शिवसेनेचे नेते आहात पण तुम्हाला महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते समजतो यावरून आपला वापर कोण कसा करतोय हे नव्याने सांगण्याची गरज नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे, रद्द झालेला नाही. तसेच राज ठाकरे हे पुण्यामध्ये २२ मे रोजी होणा-या सभेमध्ये ते बोलणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे या सभेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे काही लोकांना प्रतिक्रिया देण्याची घाई झाली असावी असेही दरेकर यांनी सांगितले.
[read_also content=”पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’ बाबत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/high-level-meeting-in-delhi-soon-on-red-zone-in-pimpri-chinchwad-assurance-of-defense-minister-rajnath-singh-nrdm-282535.html”]
खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यामुळे दौरा स्थगित झाला आहे, असे मानण्याचे कारण नाही. तेथील काही लोकांची भावना होती, ती त्यांनी व्यक्त केली असावी. ब्रिजभूषण यांचे ते वैयक्तिक आंदोलन होते. पक्षाने यासंदर्भात कुठलीही अधिकृत भूमिका घेतली नाही. त्यामुळे समन्वयाच्या माध्यमातून येणा-या काळात राज ठाकरे यांचा दौरा होऊ शकतो असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.