पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे(फोटो - सोशल मीडिया)
वारकऱ्यांचा झालेल्या या अपघातामध्ये जखमी वारकऱ्यांना तातडीने कामशेत व लोणावळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघातानंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघातानंतर तापलेल्या ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, “या भागात सातत्याने अपघात होत आहेत. वारकऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत. या महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रण, पोलिसांची गस्त, वॉर्निंग साईन बोर्ड, तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी स्वतंत्र मार्ग याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.” असा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, शेकडो वाहने अडकली आहेत. पोलिस अधिकारी व स्थानिक प्रशासन आंदोलन स्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे कारण वेग व निष्काळजी वाहनचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सुरक्षेचा व महामार्गावरील अपघातप्रवण भागांवरील उपाययोजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.






