महाराष्ट्रात बालमृत्यूंची संख्या घटली (फोटो- istockphoto)
पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश
या वर्षात राज्यात १२ हजार ७९२ बालमृत्यूंची नोंद
२०२१-२२ मध्ये ही संख्या १६ हजार ७४८ इतकी
सुनयना सोनवणे / पुणे: महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत (Health News) बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी राज्यात अजूनही पाच वर्षांखालील मुलांचे दररोज सरासरी ३५ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या वर्षात राज्यात १२ हजार ७९२ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. २०२१-२२ मध्ये ही संख्या १६ हजार ७४८ इतकी होती.
अकाली जन्म, जन्मावेळी कमी वजन, बर्थ ॲस्फिक्सिया, श्वसन ताण सिंड्रोम, न्यूमोनिया, सेप्सिस, जन्मजात विकृती आणि ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ ही बालमृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असले, तरी ते शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. प्रतिबंध करता येणाऱ्या किंवा उपचाराने बऱ्या होणाऱ्या आजारांमुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये, यासाठी विविध स्क्रीनिंग कार्यक्रम आणि गावपातळीवरील जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत.
Child Mortality : महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण घटले तरीही दररोज 35 बालकांचा होतोय मृत्यू
तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेपूर्व नियोजन आणि प्रसूतिपूर्व काळजी याला विशेष महत्त्व आहे. “महिलेच्या कुटुंबासह संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी आहे की गर्भधारणेपूर्वीपासून योग्य काळजी घेतली जावी. गर्भधारणेच्या सुरुवातीपासून योग्य वैद्यकीय सेवा मिळाल्यास अकाली प्रसूतीसारख्या गुंतागुंती टाळता येतात,” असे तज्ज्ञांनी सांगितले.
सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये दररोज सरासरी ४५ बालमृत्यू होत होते. विविध सरकारी योजनांमुळे या संख्येत घट झाली असली, तरी परिस्थिती अजूनही चिंताजनक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सार्वजनिक व ग्रामीण आरोग्य सुविधांमधील लवकर हस्तक्षेप, डॉक्टर व एएनएमना दिलेले प्रशिक्षण आणि लसीकरण मोहिमा यामुळे बालमृत्यू कमी होण्यास मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नवजात बालकांच्या पुनर्जीवन प्रक्रियेबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक प्रशिक्षण देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
‘पाच वर्षांखालील बालमृत्यू कमी करण्यासाठी साध्या पण जीव वाचवणाऱ्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. केवळ स्तनपान, योग्य वेळी पूरक आहार, संपूर्ण लसीकरण हे बालकांच्या आरोग्याचा पाया आहे.’
— डॉ. चैतन्य सोमवंशी, नवजात तज्ज्ञ
महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षांतील बालमृत्यू (० ते ५ वर्षे)
२०२५-२६ — १२,७९२
२०२४-२५ — १३,७२८
२०२३-२४ — १३,८१०
२०२२-२३ — १७,१५०
२०२१-२२ — १६,७४८
(स्रोत : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग)
पाच वर्षात २ हजार १६१ बाल मृत्यू ; स्मार्ट सिटीत धक्कादायक आकडा
बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारचे उपक्रम –
– विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करणे
– अंगणवाड्यांमार्फत मोफत पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे
– विशेष प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरची आरोग्यसेवा
– माता आणि नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘लक्ष्य’ उपक्रमाची अंमलबजावणी
– लसीकरणासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम
– आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ राबविणे






