दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच बारामती लोकसभा मतदासंघांतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येत होती. ही मागणी पुढे आली असतानाच पुणे जिल्ह्यात एकमेव भाजपाचे आमदार राहुल कुल व मागील लोकसभा निवडणूक लढविलेल्या कांचन कुल यांच्या घरी सुनेत्रा पवार यांनी भेट दिल्याने याबाबत अनेक चर्चांना ऊत आला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या सुनेत्रा पवार या नातेवाईक आहेत. ही भेट जरी कौटुंबिक असल्याचे सांगितले जात असले; तरीही सध्या सुरू असणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर झालेली भेट ही राजकारणाची नवीन गणिते मांडून जात आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहिला मिळू शकते त्यामुळेच या भेटीगाठी सुरू केले असल्याचेही चर्चा सुरू झाली आहे. आमदार कुल यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीने संपूर्ण बारामती लोकसभा मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे .
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कांचन कुल यांना ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली; तेव्हा पहिल्या शुभेच्छा सुनेत्रा पवार यांनी दिल्या होत्या आणि आता यावेळी २०२४ च्या लोकसभा उमेवारीची चर्चा होत असताना सुनेत्रा पवार यांनी प्रथमच राहुल कुल व कुटुंबियांची घेतली, यामुळे एकच चर्चा रंगली आहे.