सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री, १५ तारखेपर्यंत मोठ्या घडामोडी ; शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा दावा
“मान-सन्मानाचा आता प्रश्न उरलेलाच नाही. रोहित पवारांना माहीत आहे की, आपल्याला आता महाविकास आघाडीसोबत राहायचं नाही. त्यांचे आजोबा शरद पवार दुसरा मार्ग पत्करत आहेत. काका आधीच दुसरीकडे गेलेत. तर सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विदेशात जात आहेत. म्हणून महाविकास आघाडीसोबत राहणे त्यांना पचनी पडणारे नाही आणि ते राहणारही नाहीत. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसतील, असा दावा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांना रोहित पवारांच्या एका विधानावर मत विचारण्यात आले त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार भविष्यात एखाद्या दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला पहायला मिळतील. तर सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री म्हणून दिसतील का? राजकारणात काहीही होऊ शकतं. सुप्रिया सुळे यांची तशीही मंत्री होण्याची तीव्र इच्छा होती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नाशिक पालकमंत्रिपदासाठी चुरस आणखीनच वाढली; शिवसेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादीचाही दावा
तसंच “पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मोठ्या घडामोडी होतील, अशी माहिती राजकीय गोटातून मिळत आहे. पण ही माहिती खरी की खोटी? याची पुष्टी अद्याप झालेली नाही.” पण लवकरच शुभमंगल सावधान होणार असल्याचे सूचक विधान शिरसाट यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर तिन्ही पक्ष कधीही एकत्र दिसले नाहीत. दरम्यान येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तिथेही महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही असा प्रश्न आहे. त्यातच रोहित पवार यांनी नकतेच प्रसार माध्यमांशी बोलताना, महाविकास आघाडीत योग्य सन्मान मिळाला तरच एकत्र लढू असं म्हणत मविआतून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. नाहीतर स्वतंत्र निवडणूक लढू, असंही त्यांनी म्हटलं होतं.
तर संध्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादाविरोधात जगात भारताची बाजू मांडण्यासाठी भारत सरकारने एक शिष्टमंडळ नेमलं आहे. या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडत संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.