पाटस : पक्ष फुटला असताना, चिन्ह बदलले असताना, प्रचंड दबाव असतानाही संघर्षाच्या काळात दौंड ची जनता शरद पवार आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली. दौंड मध्ये तुतारी एवढ्या जोरात वाजेल असे वाटले नव्हते. असे मत व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडकरांचे आभार मानले.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे या गुरुवारी (दि. ६) दौंड तालुक्यात आभार दौऱ्यावर आल्या होत्या. या प्रसंगी यवत, चौफुला, वरवंड, पाटस आणि दौंड शहरात सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले. यवत येथे महिला कार्यकर्त्यांनी खासदार सुळे यांच्यावर गुलालाची उधळण करत अभिनंदन केले.
माझी जबाबदारी आणखीन वाढली
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दौंडकरांनी मला २६ हजारांच्या मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे आता माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. तालुक्यातील दुष्काळी गावांचा प्रश्न सोडवायचा आहे. सत्ता असो किंवा नसो दौंड ला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा प्रयत्न करणार आहे. मी कोणावर टीका करणार नाही, मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही त्यांना ताकद दिली जाईल, अशी आश्वासन यावेळी सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
बेरोजगारी च्या प्रश्नावर आवाज उठवणार
सध्या दूध दर , कांदाचे बाजार भाव, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी च्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे. पुढील दौऱ्यात पाटस येथील डोंगरेश्वर नगर, अंबिकानगर, भानोबानगर, पुनवर्सन येथील रहिवाशांच्या भेट घेऊन चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन सुळे यांनी यावेळी दिले. राज्य सरकारने दुधाच्या दराच्या बाबतीत योग्य निर्णय घेतल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर ही उतरावे लागेल. राज्यातील कंपन्या सोडून दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. यावर राज्यातील दोनशे आमदार गप्प आहेत? आता हातावर हात धरून बसणं आता चालणार नाही. ठाम भूमिका घ्यावी लागेल असे मत सुप्रिया सुळे व्यक्त केले.
विधानसभेसाठी नव्या चेहराचा विचार करावा
लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर जास्त हवेत जाऊ नका विधानसभेला ही आपल्याला तुतारी वाजवायची आहे. तर वरवंड येथील सभेत केशव दिवेकर म्हणाले, विधानसभेसाठी नवा चेहराचा विचार करावा, आता पक्षात पुन्हा येणाऱ्याना संधी देऊ नका असं मत सुप्रिया सुळे यांच्यासमोर व्यक्त केले.
दरम्यान, लोकसभेत निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात कोठेही न दिसणारे, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम करणारे यवत, चौफुला, वरवंड,पाटस आणि दौंड शहरातील काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर सुळे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर थांबुन होते. शुभेच्छांचे गुच्छ देऊन फोटो काढत होते. पुढे पुढे करत मी किती तुमच्यासाठी किती काम केले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत लुडबुड करत असल्याचे चित्र पहायला मिळाले.