मुंबई : तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात (Maharashtra Political News) सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका ठाकरे घराण्यातील व्यक्ती राजकीय मैदानात उतरत का? याची चर्चा सुरु आहे. कारण गिरगावात शिवसैनिकांनी लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात सुरु झाला आहे. तेजस उद्धव ठाकरे (Tejas Thackeray) यांचे पोस्टर झळकले आहे. शिवसैनिकांना असलेली प्रतीक्षा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची या बॅनरमधून दिसत आहे. त्यामुळं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC ELECTION) तेजस ठाकरे (Tejas Thackeray) स्टार प्रचारक असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन प्रतिक्रिया समोर येत आहेत.
…तर आजोबांचा वारसा घ्यावा
दरम्यान, शिंदे गटाचे नेते व प्रवक्ते किरण पावसकर यांची तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) ही आपल्या पध्दतीने प्रयत्न करत आहेत. एकाला वाचवण्यासाठी आणि संघटना वाचवण्यासाठी हा असलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरे घरातला मुलगा असल्यामुळे तेजस ठाकरेंना देखील वाटत असेल की, आपण वडिलांसोबत काम करावं. पण तेजस ठाकरेंनी वडिलांचा वारसा न घेता आजोबांचा वारसा घेतला असता तर बरं झालं असतं, अशी खोचक टिका पावसकरांनी केली आहे. दरम्यान, घरात बसून निवडणुका होणार नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये राहणारे, लोकांचे प्रश्न समजून घेणारे नेते हवेत, असा देखील टोला पावसकरांनी ठाकरेंना लगावला आहे.
तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन जुंपली
तेजस ठाकरेंच्या काल पोस्टर्सवरून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन जुंपली आहे. कालच्या पोस्टर्सनंतर ठाकरे गटातील नेत्यांनी तेजस ठाकरे यांचे व्हीडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यावर शिंदे गटाकडून टिका होतेय, त्यामुळं दोन्ही गटात तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन जुंपल्यांच चित्र पाहयला मिळते.
राजकारणात एन्ट्री करणार का?
शिवसेना सध्या अत्यंत खडतर मार्गावरुन मार्गक्रमण करते आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी अभूतपूर्व बंड केले. शिवसेना नेतृत्व आणि संपूर्ण पक्षासह राज्याच्या राजकारणालाही हा अत्यंत मोठा धक्का होता. या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि चिरंजीव आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरदार सक्रीय झाले. दरम्यान, आता उद्धव आणि आदित्य यांच्यासोबतच तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हेसुद्धा राजकारणात एन्ट्री करणार का? याबाबत चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
काय आहे पोस्टर्सवर मजकूर…
मुंबईतील गिरगावात शिवसैनिकांनी तेजस ठाकरे यांचे पोस्टर लावले आहे. “आजची शांतता…. उद्याचे वादळ…नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे” अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. शिवसैनिकांना असलेली प्रतीक्षा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची या बॅनरमधून दिसत आहे. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीत उतरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोण आहेत तेजस ठाकरे?
तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे धाकले चिरंजीव आणि आदित्य ठाकरे यांचे छोटे बंधू आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासारखा अथवा मुंबईतील महाविकासआघाडीचा मोर्चा यांसारखा अपवाद वगळता तेजस ठाकरे हे राजकीयदृष्ट्या फारसे कुणाला जाहीरपणे दिसले नाहीत. निसर्गातील जैवविविधता शोधणे वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधन, हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. आतापर्यंत त्यांनी खेकड्यांच्या अकरा प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधल्या आहेत. ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे.
‘तेजस गरम डोक्याचा पोरगा’
‘तेजस गरम डोक्याचा पोरगा’ म्हणून त्यांची ओळख आहे. एकदा शिवतीर्थावरील भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचा उल्लेख ‘गरम डोक्याचा पोरगा’ अशी केली होती. तेव्हापासूनच अनेक शिवसैनिकांच्या मनात तेजस ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी तेजस ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करावा असे म्हटले आहे.