ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : 26 जून हा अंमली दिन म्हणून साजरा केला जातो याचपार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान” राबवण्यात आले आहे. शासकीय विश्राम गृह येथून सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली.तसेच ही रॅली कोर्ट नका, मार्केट परिसरातून तलाव पाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळी सेंट जॉन शाळेतील व शेठ एन. के. टी कॉलेजचे (एन.एस. एस) मधील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या मुलांनी ” हम सबका एक ही नारा, नशा मुक्त हो देश हमारा” असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली.
सध्याची तरुण मंडळी अगदी किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार तरुण मंडळी यांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. यासगळ्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या सगळ्याला आळा घालणं महत्वाचं आहे ही बाब लक्षात घेत ठाण्यात देशहितासाठी तरुणांनो नशा मुक्त व्हा असा नारा देत भव्य रॅली काढण्यात आली. नशा मुक्त व्हा कारण नशा मुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल असं देखील .यावेळी सांगण्यात आलं होतं.
सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडत आहेत. या युवा पिढीला अंमली पदार्थापासून प्रवृत्त करण्यासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती. या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून जास्त जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितले.






