कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात
विजय काते, मीरा भाईंदर : भाईंदर (पूर्व) येथील इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळ मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (13 जुलै 2026) घडली. उघड्या चेंबरमध्ये एक म्हैस पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तब्बल चार तास सुरू असलेल्या जीवघेण्या बचाव मोहिमेनंतर नवघर पोलीस, मिरा-भाईंदर अग्निशमन विभाग, शिवसेनेची युवासेना आणि स्थानिक प्राणीप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून म्हशीची सुखरूप सुटका करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, मिरा-भाईंदर अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक प्राणीप्रेमी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चेंबर अरुंद आणि खोल असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. म्हशीला कोणतीही इजा होऊ न देता बाहेर काढण्यासाठी दोरखंड, यंत्रसामग्री आणि विविध तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला. सलग चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर म्हशीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या बचाव मोहिमेत अग्निशमन विभागाचे प्रशांत हसनाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने काम केले. नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील, पोलीस शिपाई सुभाष भोये, शुभम धात्रक, निलेश नवले आणि योगेश भोजने यांनीही बचावकार्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. शिवसेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक प्राणीप्रेमींनीही सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे म्हशीचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक करत आभार मानले.
या घटनेनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गटारांवर सुरक्षित लोखंडी झाकणे बसवण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असतानाही अनेक ठिकाणी मजबूत झाकणांऐवजी तात्पुरत्या लाकडी फळ्या ठेवून काम भागवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर तपोवन शाळा आहे. या उघड्या चेंबरमध्ये एखादा विद्यार्थी, पालक किंवा नागरिक पडला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मनपाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व उघडी चेंबर्स आणि धोकादायक गटारे तातडीने शोधून त्यावर सुरक्षित झाकणे बसवावीत, तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे (नवघर पोलीस ठाणे)
पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील
पोलीस शिपाई सुभाष भोये
शुभम धात्रक
निलेश नवले
योगेश भोजने
अग्निशमन विभागाचे प्रशांत हसनाळे व सहकारी
शिवसेनेची युवासेना
स्थानिक प्राणीप्रेमी






