आमदार रोहित पाटील थेट दिल्लीतील 'जंतर-मंतर'वर
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठा प्रतिसाद मिळत असताना आमदार रोहित पाटील यांनी थेट जंतर-मंतरवर पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तीन तासांहून अधिक काळ आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, मागण्या आणि आंदोलनाची दिशा समजून घेतली. संघर्षाच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी नैतिक पाठिंब्याची ग्वाही दिली.
यावेळी विद्यार्थ्यांसमवेत उभे राहत आमदार रोहित पाटील यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा निषेध करत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीमध्येही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत त्यांनी सांगितले की, शांततामय आणि लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांच्या मागण्या केवळ त्यांच्या नाहीत, तर देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी दाखवलेला संयम, शिस्त आणि लढाऊ आत्मविश्वास याचेही त्यांनी कौतुक केले. कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू न देता विद्यार्थी अत्यंत शांततेत आणि संविधानिक मार्गाने आपला लढा लढत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा संघर्ष केवळ एका परीक्षेचा नसून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच या आंदोलनाची मूळ भूमिका आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या निर्धारात कोणतीही कमी झालेली नाही. देशाच्या भवितव्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”
यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी सुरू असलेल्या घडामोडींचाही आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. जागा मिळेल त्या मार्गाने दिल्ली गाठण्याची धडपड अनेकांकडून सुरू असून आंदोलनाची व्याप्ती क्षणाक्षणाला वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून उमटणारा हा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवी ताकद देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिल्लीतील आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे आमदार रोहित पाटील हे राज्यातील मोजक्या जनप्रतिनिधींमध्ये ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मैदानात उतरून भूमिका घेणाऱ्या त्यांच्या या भेटीची राज्यभरात चर्चा सुरू असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो






