पिंपरी : नागरिकांच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार देश स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत देश पातळीवर महापालिकेचा ठसा उमटविण्यासाठी शहरातील ३ लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालयानुसार तिरंगा झेंडा वितरण व्यवस्था करण्यात येणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चळवळीत नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संस्था, सोसायट्यांचा सहभाग वाढवावा आणि देश प्रेमाची भावना निर्माण करून प्रोत्साहित करण्याच्या सूचना देखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिल्या.
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत मनपा विभाग प्रमुख व क्षेत्रिय अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, विठठल जोशी, अजय चारठणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, सह शहर अभियंता सतिष इंगळे, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, प्रमोद ओंबासे, उपायुक्त रविकिरण घोडके, आयटीआय चे प्राचार्य शशीकांत पाटील, सहायक आयुक्त नीलेश देशमुख, विनोद जळक तसेच मनपा क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.
नागरिकांसाठी अल्प किमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध
मनपाच्या आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ध्वज वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी अल्प किमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात येतील. ध्वज खरेदी करून नागरिकांनी आपल्या घरावर अथवा इमारतीवर फडकवायचा आहे. नियमीत मालमत्ता कर भरणाऱ्या ६ ते ७ हजार नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार आहे. तसेच, ३२ ठिकाणी फलेक्स लावण्याचे नियोजन आहे.
अनेमिया मुक्ती जनजागृती, निबंध स्पर्धा
शहरातील पाण्याची टाकी, उडडाणपुलांची सजावट व विद्युत रोषणाई, वृक्षारोपण कार्यक्रम, चित्ररथ, सेल्फी पॉईंट तसेच प्रभात फेरीद्वारे अनेमिया मुक्ती जनजागृती तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष व्यक्तींच्या हस्ते शासकीय कार्यालये, शाळा / महाविद्यालय, विरंगुळा केंद्र, रुग्णालये, चित्रपट गृह अशा ७५ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दि. ११ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्लॉगेथॉन घेण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.
[read_also content=”पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय?; मुख्यमंत्र्यांसमोर आमदार महेश लांडगे यांची आक्रमक भूमिका https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-the-relationship-between-pimpri-chinchwad-authority-and-pmrda-aggressive-stance-of-mla-mahesh-landge-in-front-of-chief-minister-nrdm-311098.html”]
दरम्यान शाळा, महाविद्यालये, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोसायटी, सामाजिक व राजकीय संघटनांनी या चळवळीत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील आयुक्त पाटील यांनी यावेळी केले. प्रसंगी, मनपा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावयाच्या जबाबदाऱ्याबाबत चर्चा करण्यात आली. रविकिरण घोडके यांनी उपक्रमासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली.