मुलीच्या आत्महत्येस पुजारी कारणीभूत ठरला; अघोरी कृत्य करत...; नेमके काय आहे प्रकरण?
वसई किल्ल्यातील हनुमान मंदिरात अघोरी कृत्य करणाऱ्या स्वयंघोषित पुजारी अजय राणा आणि त्याचा मुलगा आयुष राणा यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर एका तरुणीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. रेवती निळे या तरुणीचे आयुष राणाशी प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मात्र तिच्या जातीचा मुद्दा पुढे करत अजय राणाने लग्नाला विरोध केला आणि कुंडली न जुळण्याचे कारण दिले. त्यानंतर आयुषने तिचा नंबर ब्लॉक केल्याने रेवतीने नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केली.
अजय राणा वसई किल्ल्यातील हनुमान मंदिराचा पुजारी असून त्याने मंदिरात अघोरी साधना सुरू केली होती. त्याचाच प्रयोग त्याने रेवतीवरही केला. मृत्यू योग असल्याचे सांगून तिला गाठी बांधलेले दोरे, मंत्र पठण, उदी आणि फुले यासारख्या गोष्टी दिल्या जात होत्या. या मानसिक त्रासातून ती खचली आणि शेवटी आत्महत्या केली. पोलिसांनी अजय व आयुष राणाला अटक केली असून, त्यांच्याविरोधात जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अजय राणाने हनुमान मंदिरावर बेकायदेशीर कब्जा करून तेथे घरासारखा संसार थाटला होता. त्याने गॅस, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफे यासारख्या वस्तू मंदिरात ठेवून धार्मिक स्थळाचा अपमान केला. तो मंदिरात प्रसाद म्हणून मांस देत होता आणि अमावस्येच्या रात्री पूजा करीत होता. त्यामुळे या प्रकारामुळे मंदिराचे आणि किल्ल्याचे पावित्र्य भंगले.
सोशल मिडियावर प्रसिद्धीसाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट…; महाबळेश्वरमध्ये चाललंय काय?
या प्रकरणामुळे वसईकरांमध्ये संताप व्यक्त होत असून, पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गड-किल्ले संवर्धनात लहानसहान कामांसाठी परवानगी घेणाऱ्यांवर बंधने असताना, मंदिरावर बेकायदेशीर कब्जा करून अघोरी कृत्य करणाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले, ही बाब चिंताजनक ठरत आहे.