सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन वसंत मोरेनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
25 नगरसेवक निवडून आणणार
1992 मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत विभाग प्रमुख झालो. नंतर मनसेत गेलो. आता शिवसेनेत आलोय. पुणे शहरात भविष्यात किमान 25 नगरसेवक निवडून आणणार, असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिला. मनसे पदाधिकारी माझ्या सोबत आल्याचे वसंत मोरे म्हणाले.
शिवसेनेची ताकद वाढणार – राऊत
वसंत मोरे आता खूप पुढे आले आहेत. ते मातोश्री पर्यंत पोहचले आहेत. त्यांना आहेत तिथेच थांबवू. तात्या लोकसभा निवडणूक लढले. मातोश्री हे त्यांचे शेवटचं डेस्टिनेशन आहे. ते जुने शिवसैनिक आहेत, असे यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिले आहेत. ते शिवसेनेत आल्यामुळे पुणे खडकावसला येथे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपण सर्वांनी मिळून पुण्यातली शिवासेना पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.
वसंत मोरेंचा पदाधिकाऱ्यांसोबत प्रवेश
दरम्यान वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आज वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.