फोटो सौजन्य - Social Media
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून सोमवारी रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे काही काळासाठी वीजपुरवठाही खंडित झाला होता, मात्र तरीही नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यापैकी रिसोड परिसरात झालेल्या पावसामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही रिसोड, मालेगाव आणि शिरपूर परिसरात तुलनेने चांगला पाऊस झाला होता. यंदाही सुरुवातीची हजेरी रिसोडमध्ये लागल्याने शेतकरी आशावादी झाले आहेत.
मात्र कृषी तज्ज्ञांच्या मते, हा पाऊस अद्याप मान्सूनचा नसून स्थानिक वातावरणीय बदलांमुळे झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. गेल्या वर्षी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. त्यामुळे यंदा पुरेसा आणि स्थिर पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी सुरू करण्याचा विचार शेतकरी करत आहेत.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे आणि मजुरांची उपलब्धता यासाठी शेतकरी बाजारपेठांमध्ये खरेदी करताना दिसत आहेत. योग्य वेळी पेरणी करता यावी यासाठी आधीच तयारी सुरू करण्यात आली आहे.
वाशिम तालुक्यातील शेतकरी सचिन भालेराव यांनी सांगितले की, तालुक्यात ढगाळ वातावरण असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा पेरणी काहीशी उशिरा होण्याची शक्यता आहे. तर सुरकंडी येथील शेतकरी किसन इरतकर यांनी अनेक शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून ठेवले असून आता सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले असल्याचे सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देत, जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. मुबलक आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






