मुंबई- मुख्यमंत्री अनेकदा राज्यपालांबरोबरचा (governor) संघर्ष टाळतात. केंद्राशी पंगा कशाला? असे त्यांचे धोरण असते, पण तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (CM Stalin) यांनी राज्यपालांशी संघर्ष केला व तामीळनाडू (Tamilnadu) अस्मितेसाठी केंद्राशी पंगाही घेतला. महाराष्ट्रातील शेपूटबहाद्दरांनी हे लक्षात घेतले पाहिजे. शिवरायांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे राज्यपाल राजभवनात सुखात आहेत व तिकडे स्टॅलिन यांनी त्यांच्या राज्यपालांना पळवून लावले व ‘गेट आऊट रवी’ची जोरदार मोहीम सुरू केली. राज्यपाल हे घटनेचे रखवालदार म्हणून काम करतात. केंद्र व राज्यातील दुवा म्हणून ते कर्तव्य बजावतात. एक प्रकारे ते पांढरे हत्तीच असतात. या पांढऱ्या हत्तींनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावे हीच अपेक्षा आहे, पण हे पांढरे हत्ती सध्या उधळू लागले आहेत. श्रीमान स्टॅलिन यांनी उधळलेल्या पांढऱ्या हत्तीस पळवून लावले. शाब्बास स्टॅलिन! असं स्टँलिन यांचे कौतूक करत महाराष्ट्रातील राज्यपालांवर (Bhagat singh Koshyari) टिका केली आहे.
[read_also content=”माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दिग्गजांकडून शोक व्यक्त https://www.navarashtra.com/india/former-union-minister-president-sharad-yadav-passed-away-he-breathed-his-last-at-the-age-of-seventy-five-mourned-by-veterans-361284.html”]
दरम्यान, तामिळनाडूचे राज्यपाल राष्ट्रगीतास न थांबता बाहेर पडले. राज्यपाल हे सरकारवर लादत आहेत, अशी टीका आता सुरू झाली आहे. राज्यपालांनी तामीळ अस्मितेचा अपमान केल्याने तामीळनाडूत सर्वत्र ‘गेट आऊट रखी’ अशी पोस्टर्स झळकली आहेत. राज्यपालांना परत बोलवावे अशी जोरदार मोहीम सुरू झाल्याने तामीळनाडूतही ‘राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटला आहे. जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याचेच दुसरे रूप तामीळनाडूत दिसत आहे. फरक इतकाच की, महाराष्ट्रात राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करूनही सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे चिडीचूप आहेत; पण तामीळनाडूत राज्यपालांनी रामासामी पेरियार, डॉ. आंबेडकर, करुणानिधी अशा थोरांचा अपमान करताच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विधानसभेत राज्यपालांसमोरच स्वाभिमानाचे दंड थोपटले.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी विधानसभेत जे घडले त्याचे स्वागत केले. उदयनिधी म्हणतात, “आमच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पळवून लावले!” देशातील अर्धा डझन राज्यांत ‘सरकार विरुद्ध राज्यपाल’ असा संघर्ष वाढला आहे व ही सर्व राज्ये बिगरभाजप शासित आहेत. या राज्यांतील राजभवनात भाजपच्या लोकांनी स्वतःची कार्यालये थाटली आहेत व राजभवनातून ते सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ असताना विद्यमान राज्यपाल उकळत्या तेलातील पापडाप्रमाणे तडतडत होते. सरकारच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मार्गदर्शन करीत होते. सरकारी निर्णय व शिफारसी टाळत होते. 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांची नियुक्तीही त्यांनी अशीच लटकवून ठेवली, पण राज्यात सत्ताबदल होताच कुठेच दिसत नाहीत, अशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर सामनातून टिका करण्यात आली आहे.