नागपूर : नागपूरला मुंबईशी जोडून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सेवेत दाखल झाला. मात्र, सुरुवातीपासूनच या रस्त्याला अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. समृध्दीचा प्रवास म्हटले, उरात धडकी भरत आहे. लोकांच्या मनातील ही भिती घालवून समृद्धीवर महामार्गावरील अपघाताला आळा बसावा आणि प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातले (Nagpur University) संशोधक प्रियल चौधरी, डॉ. संजय ढोबळे यांनी राज्य सरकार आणि महामार्ग विकास प्राधिकरणाला धोरणात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत.
व्हिएनआयटीच्या टीमने केलेल्या संशोधनातून समृद्धीवरील अपघाताची कारणमीमांसा केली गेली. यात प्रामुख्याने संमोहन आणि वाहनाचे टायर फुटणे ही दोन प्रमुख कारणे समोर आली. सोबतच समृध्दी रस्ता सरळ आणि सिमेंटच्या शुभ्र पांढऱ्या रंगाचा फिल देतो. त्यामुळे चालक वाहन वेगाने चालविण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे, चालकाचे स्वतःचे नियंत्रण विसरुन तो संमोहित होतो व वाहनावरचा ताबा विचलित होतो. दुसरे कारण जेव्हा वाहन सरळ दिशेने 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तेव्हा, टायर गरम होतो. त्यामुळे चाकातील दाबामुळे टायर फुटतो. सोबतच ट्रकच्या मागे फ्लोरोसेंट टेप नसतो. ही वाहन उभी आहेत की धावत आहे, याचा अंदाज येत नाही.
अशा कराव्यात उपाययोजना…
वाहनचालकाला संमोहनापासून दूर ठेवायचे असेल त्यांनी दर 150 किलोमीटर नंतर वाहनाची वेगमर्यादा 150 प्रतितास 120 किलोमीटर करावी. पुन्हा दोन किलोमीटर नंतर 80 व 60 व नंतर 40 किलोमीटर प्रति तास असा प्रवास करावा. तशा सूचनांचे फलक दुतर्फा ठळक अक्षरांत लावावेत. वाहनाचा वेग 40 किलोमीटर / तास झाल्यानंतर अर्धा किलोमीटरवर पाणी साचवून ठेवावे.
अर्धा किलोमीटर वाहन पाण्यातून गेल्याने टायर थंड होईल. हवेचा दाब कमी झाल्याने 150 किलोमीटरपर्यंत टायर फुटणार नाही. दर 150 किलोमीटरवर प्रसाधनगृह, उपहारगृहाची सोय करावी. त्यामुळे चालक संमोहित होणार नाही. चालकाने 5-10 मिनिटे फ्रेश व्हावे व नंतर प्रत्येक 2 किलोमीटर वाहनाची गती 20 किलोमिटरने वाढवावी. महामार्गावर निःशुल्क नायट्रोजन गॅस, पंक्चर दुरुस्तीची सोय करावी. रस्त्याच्या दुतर्फा रंगीत झेंडे लावून पोलीस गस्त वाढवावी.