फोटो सौजन्य - Social Media
रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर जोर आला आहे. ईशाने नुकतीच भीती, शांतता आणि धैर्य याविषयी सूचक पोस्ट शेअर केल्यानंतर आता तिची आई पूनम रिखी यांनीही कर्म आणि न्यायावर आधारित काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये बादशाहचं नाव कुठेही नसले, तरी त्या नेमक्या या घडामोडींनंतर आल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
पूनम रिखी यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर भगवान शंकराची प्रार्थना करणाऱ्या महिलेचा फोटो शेअर करत लिहिलं, “कर्म परत येतंच. जर तुम्ही एखाद्याचं आयुष्य कठीण केलं असेल, तर देव तुमचं मरणही कठीण करेल.” दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी, “कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही कोणाला रडवलं असेल, तर एक दिवस तुम्हालाही अश्रू ढाळावे लागतील. देव माफ करू शकतो, पण कर्म कधीच माफ करत नाही,” असा संदेश दिला.
दरम्यान, ईशा रिखीनेही तिच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव न घेता दीर्घकाळ भीतीपोटी शांत राहिल्याचं सांगितलं. “माझी शांतता म्हणजे स्वीकार नव्हता, तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. आता मी भीतीऐवजी धैर्याची निवड करत आहे. संपूर्ण सत्य सांगण्याची वेळ अजून आलेली नसली, तरी सर्व काही ठीक असल्याचं भासवणं मी थांबवत आहे,” असं तिने लिहिलं.
याआधी ईशाने बादशाहसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, “प्रत्येक वादळ एक धडा असतो, प्रत्येक प्रार्थना एक आशा असते,” असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, बादशाह किंवा ईशा या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बादशाह याचं यापूर्वी जॅस्मिन मसीह हिच्याशी २०१२ मध्ये लग्न झालं होतं. २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना जेस्सेमी ग्रेस मसीह सिंग ही मुलगी असून दोघे मिळून तिचा सांभाळ करत आहेत. त्यानंतर बादशाह आणि ईशा रिखी यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. सध्या सोशल मीडियावरील या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व पोस्टचा संबंध बादशाहशीच आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.






