फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरला आहे ‘काला हिरण’ हा आगामी चित्रपट. 1998 मधील गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणाशी साधर्म्य असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानने कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे (Personality Rights) उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सलमानने चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्टर्स, प्रमोशनल साहित्य आणि जाहिरात मोहिमा तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘काला हिरण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत श्रीनाते यांनी केले असून निर्माते अमित जानी आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. पोस्टरमध्ये बंदूक हातात घेतलेला एक व्यक्ती दिसत असून त्याच्या हातातील ब्रेसलेट सलमान खानच्या प्रसिद्ध टर्कॉइज ब्रेसलेटशी साधर्म्य दाखवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच चित्रपटाचा टीझर 20 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही पोस्टरमधून करण्यात आली होती. निर्मात्यांनी हा चित्रपट वास्तविक घटनांवर आणि न्यायालयीन संघर्षांवर प्रेरित असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानकडून कायदेशीर नोटीस प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्यांनी असा आरोप केला की, सलमान खान आपल्या स्टारडमचा प्रभाव वापरून ‘काला हिरण’ चित्रपटाशी संबंधित लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कथित नोटिशीचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सलमान खान किंवा त्यांच्या अधिकृत टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या वादाची पार्श्वभूमी 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणाशी जोडली जाते. राजस्थानातील जोधपूर येथे ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि काही सहकलाकारांवर संरक्षित काळवीटाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बिश्नोई समाजाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सलमान खान यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली. दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर खटल्यातील विविध टप्प्यांवर सुनावण्या झाल्या आणि एका न्यायालयाने त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान खान आणि बिश्नोई समाज यांच्यातील वाद अनेक वर्षे चर्चेत राहिला. याच पार्श्वभूमीवर 2024 मध्ये मुंबईतील सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांच्या तपासानुसार या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर सलमान खान यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.
2025 मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सलमान खान यांनी त्यांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत प्रतिक्रिया दिली होती. आयुष्याचे सर्व निर्णय ईश्वराच्या हाती असल्याचे सांगताना त्यांनी वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद केले होते. आता ‘काला हिरण’ चित्रपटावरून निर्माण झालेला नवा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे बॉलिवूडसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






