(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना भावनिक आणि थरारक वळणाचा अनुभव पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या अंबादासच्या कुटुंबावर एक भयंकर संकट ओढावते, जेव्हा स्वामी कृपेने जन्मलेल्या त्यांच्या लाडक्या मुलगा वेदच्या आयुष्यावर मृत्यूयोगाची काळी छाया पसरते. एका आईची हतबल माया, वडिलांची अढळ श्रद्धा आणि गावात पसरत चाललेले भोंदू चमत्कार यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते.
या कठीण प्रसंगी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अधिकच धूसर होत जाते. मृत्यू हा शेवट नसून श्रद्धेची खरी परीक्षा असते, हे या कथानकातून प्रभावीपणे दाखवले जात आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अंबादास कुटुंब सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, त्यांची श्रद्धा सतत कसोटीवर येते. वेदच्या जीवासाठी सुरू असलेल्या या संघर्षात भावनिक ताण आणि अनिश्चिततेची छाया स्पष्टपणे जाणवते.
याच दरम्यान गावात एका नव्या इसमाची एन्ट्री होते, जो आपल्या तथाकथित चमत्कारांनी लोकांना भुरळ घालू लागतो. काही गावकरी त्याच्या प्रभावाखाली जातात, तर काहींचा विश्वास अजूनही स्वामींवर ठाम राहतो. या दोन विचारसरणींमधील संघर्षामुळे कथेला आणखी गूढ आणि रोचक वळण मिळते. एका निष्पाप जीवाचे आयुष्य वाचवण्यासाठी कोणता मार्ग योग्य—श्रद्धा की भ्रम—हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहतो.
“मेरा जी नही भारा…” म्हणत Salman Khan ने दिला इशारा; व्हायरल व्हिडीओने चाहत्यांची वाढली उत्सुकता
दरम्यान, स्वामींच्या शांत आणि गूढ लीलांमधून घडणाऱ्या घटना मात्र काहीतरी वेगळंच सूचित करत असतात. श्रद्धा टिकवून ठेवणाऱ्यांची परीक्षा घेतली जाते, नात्यांची खरी ताकद उलगडते आणि नियतीसमोर उभे ठाकलेले संकट अधिक गडद होत जाते. या सगळ्या घडामोडींमध्ये वेदच्या आयुष्याचे भविष्य काय असेल आणि स्वामींची कृपा त्याला वाचवेल का, याची उत्कंठा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरत आहे.
भावनिक नाट्य, आध्यात्मिक संदेश आणि थरार यांचा संगम असलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाला भिडत असून, प्रत्येक भागासोबत उत्कंठा वाढवत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा’ दररोज संध्याकाळी ६.३० वा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळतो, जिथे श्रद्धेची खरी शक्ती आणि विश्वासाची कसोटी अनुभवायला मिळते.






