(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत खूप गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेला ‘दशावतार’ हा चित्रपट आता टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या उत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट २१ डिसेंबर २०२५ रोजी झी मराठी वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर म्हणून प्रसारित होणार आहे. चित्रपटगृहात मोठे यश मिळवल्यानंतर आता प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘दशावतार’ची कथा कोकणातील पारंपरिक दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांच्याभोवती फिरते. वैयक्तिक दु:खामुळे हादरलेल्या मेस्त्रींच्या आयुष्यात खाण प्रकल्पामुळे गावावर आलेले संकट, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मुलाच्या मृत्यूमागील सत्याचा शोध अशा अनेक थरांचा प्रवास उलगडत जातो. लोककला, श्रद्धा आणि आधुनिक वास्तव यांचा संगम साधत, बाबुली मेस्त्रींची शेवटची दशावतारी कामगिरी चांगल्या आणि वाईटातील थरारक लढाई ठरते.या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Year Ender 2025: कमी चर्चेतले पण दमदार चित्रपट कोणते, चाहत्यांच्या मनावर कोरले गेले; वाचा यादी
या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने झी मराठीने एक अनोखा उपक्रम राबवला तो म्हणजे झी मराठी मालिकांमधील कलाकार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू, जयंत, संतोष आणि वेंकी, ‘तारिणी’ मालिकेतील केदार, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील रोहन, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील सारंग, तसेच ‘कमळी’ मालिकेतील हृषी हे सर्व कलाकार ‘दशावतार’मधील विविध अवतारांमध्ये दिसले. त्यांच्या या उपक्रमामधून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि आदर स्पष्टपणे जाणवला.
Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट
ह्या सर्व कलाकारांची रंगभूषा केली ती म्हणजे ‘दादा राणे कोनस्कर’ आणि ‘उदय राणे कोनस्कर’ त्यांची सेटवरील उपस्थिती हा क्षण आणखी खास बनवणारी ठरली. खऱ्या आयुष्यातील दशावतारी नाटकांचे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर गेली ३४ वर्षे दशावतारी रंगभूमीवर कार्यरत आहेत. तसेच या दोघांनी आजपर्यंत ७००० पेक्षा अधिक प्रयोगांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंपरा, संस्कृती आणि थरार यांचा संगम असलेला ‘दशावतार’ पाहण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नका.






