अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पवित्र रिश्ता ते तू तिथे मी अशी लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती प्रियाने मिळवली होती. प्रियाच्या अशा जाण्याने अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांची पोस्ट देखील सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांच्या नव्या प्रोजेक्टचे सर्व अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. मात्र या सोशल मीडियामुळे अनेकदा विनाकारण कालाकारांना ट्रोल देखील केलं जातं. याच मुद्यावर मुग्धा गोडबोले यांनी खंत व्यक्त केली आहे.
जुलै 2023 मध्ये प्रियाने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘ प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे.’ चॅनेलनेही आपल्या official page वरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अश्या. काय वाटलं असेल तिला? प्रिया गेली. दोन वर्ष झगडून थकली. त्याबद्दल अतोनात दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टगी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती. फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न. का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके? स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात. विष पसरत जातं.
सोसश मीडियावर होणारं ट्रोलिंग याचा कुठे ना कुठे कलाकरांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो. माणूसकी सोडून टीका करणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील अनेकदा कलाकरांनी उपस्थित केलेला आहे. याच मुद्यावरुन मुग्धा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. पवित्र रिश्ता, तू तिथे मी, तुझेच मी गीत गात आहे या आणि अशा लोकप्रिय मालिकेतून प्रियाने खलनायिकेची भूमिका साकारली. अ परफेक्ट मर्डर या नाटकातील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.