Sairat Actor Salya Aka Arbaz Shaikh Will Soon Tie The Knot With His Girlfriend
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीवर एक इतिहास रचला. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला. आर्ची, परश्या, सल्या आणि जब्या या चौघांनाही चित्रपटाने विशेष प्रसिद्धी दिली. आता त्यातीलच एक कलाकार प्रसिद्धीझोतात आला आहे. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख आता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.
‘बॉर्डर २’च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात, निर्मात्यांनी शेअर केला सेटवरील फोटो
सैराटमधील बांगडीवाल्या भाभीचा सल्ल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख आता लवकरच लग्नबोहल्यावर चढणार आहे. अरबाज शेख लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अरबाजने यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत अनेकदा इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सिमरन असं असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. २०१९ सालापासून अरबाज आणि सिमरन हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. सिमरन पुण्यात राहते. त्यामुळे तिने अरबाजच्या यशाचा प्रवास खूप जवळून पाहिला आहे. दोघांनीही अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
अनेकदा दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांप्रती उघडपणे प्रेमाची कबुली दिली आहे. लवकरच अरबाज आणि सिमरन हे दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जाते. अद्याप त्यांच्या लग्नाबद्दलची माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. अरबाज शेखने ‘सैराट’ चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला एकाच रात्री मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अरबाजने ‘यारी’, ‘संघर्ष योद्धा जरांगे पाटील’, ‘मुसंडी’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘झुंड’, ‘एकदम कडक’ अशा चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अभिनयासोबतच अरबाजने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याने पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ ‘बेक बडीज’ नावाने केक आणि कॅफे सुरू केले आहे.